नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षात एकनाथ शिंदे गटाने नवी खेळी खेळताना सर्वोच्च न्यायालयामध्ये रिट याचिका दाखल करत केंद्रीय निवडणूक आयोगापुढील सुनावणी सुरूच ठेवण्याची मागणी केली आहे. अंधेरीतील विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाने शिवसेनेचे निवडणूक चिन्ह आपल्याला मिळावे यासाठी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या मुंबई दौऱ्यानंतर शिंदे गटाच्या हालचाली वाढल्या आहेत. शिवसेनेची ओळख असलेला ‘धनुष्यबाण’ हे पक्षचिन्ह मिळविण्यासाठी शिंदे गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे धाव घेतली होती. पण न्यायालयाने आयोगाच्या सुनावणीला स्थगिती दिली होती.

तसेच पाच न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर याबाबत सुनावणी होणार आहे. मात्र महाराष्ट्रातील प्रकरणावर सुनावणी कधी होणार? याबद्दल अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. निवडणूक आयोगाच्या सुनावणीला स्थगिती देऊ नये अशी मागणी शिंदे गटाने न्यायालयाकडे केली आहे. या प्रकरणावर न्यायालयाने त्वरित सुनावणी सुरू करून निवडणूक आयोगाच्या प्रक्रियेसंदर्भात निर्णय द्यावा, अशीही विनंती या याचिकेत करण्यात आली आहे. शिंदे गटाच्यावतीने आज सर्वोच्च न्यायालयात कागदपत्रे दाखल करण्यात आली आहेत.

अधिक वाचा  धक्कादायक! पोलिस ठाण्यालगत झोपलेल्या एकाचा डोक्यात दगड घालून खून

म्हणून पक्षचिन्हाचा प्रश्न

मुंबईमधील अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे त्यांची जागा रिकामी झाली आहे. या जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. शिवसेनेने लटके यांच्या पत्नीला उमेदवारी दिली असून शिंदे गटानेही या जागेसाठी निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शिंदे गटाला पक्षचिन्ह कोणते मिळणार असा प्रश्न उपस्थितीत होत आहे. त्यासाठीच शिंदे गटाने आता न्यायालयात धाव घेतली आहे. आयोगाकडून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना त्यांची बाजू मांडण्यासाठी २३ सप्टेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.