‘आम्ही कोणासोबत युती केली आहे, 2019 मध्ये ज्या निवडणुका झाल्या, त्यात बाळासाहेब आणि मोदी यांचे फोटो लावून आम्ही मतदारांसमोर गेलो. आम्ही चुकीचं काम केलं नाही. ज्या पक्षासोबत निवडणूक लढवली आणि जनतेचा देखील हाच कौल होता की, शिवसेना-भाजप युतीच सरकार आलं पाहिजे. मात्र समीकरण बदललं, दुसरं सरकार आलं, ते आम्ही दुरुस्त केलं”, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. आज मुख्यमंत्री शिंदे एबीपी माझाच्या कार्यालयात आले होते. यावेळी त्यांनी एबीपी माझाच्या कार्यालयात विराजमान बाप्पाची आरती केली. यानंतर झालेल्या मुलाखतीत ते असं म्हणाले आहेत.
‘जनता खुश आहे’
तत्पूर्वी बोलताना ते म्हणाले होते की, आज जनता खुश आहे. जे 2019 मध्ये व्हायला हवं होतं, ते आम्ही आता केलं. 2019 मध्ये जे झालं ते कोणालाच आवडलं नाही. ते म्हणाले, मतदारांनी युतीला कौल दिला होता. आता हे झाल्यानंतर मला खूप लोकांनी फोन करत अभिनंदन केलं. अनेक लोक मला म्हणाले, आम्ही युतीला मतदान केलं होतं. जनतेने युतीच्या बाजूने कौल दिला होता. त्यामुळे असे नवीन प्रयोग करताना आम्हाला विश्वासात घ्यायला हवं होतं. आमची मतं घेऊन आमच्याशी विश्वासघात झाला होता. त्यामुळे आज आम्ही खूप खुश आहोत, असे मला अनेक लोक म्हणाले.
‘मी कधीही मुख्यमंत्री व्हावं, म्हणून हे काम केलं नाही’
तुम्ही गेल्यावर्षी गणपतीला काय मागितलं होतं, असं त्यांना विचारलं असता ते म्हणाले की, मी नेहमी या महाराष्ट्रातील जनतेला सुखीकर. बळीराजाला सुखीकर, या राज्यावर कोणतेही संकट येऊ नये, हे मागत असतो. ते म्हणाले, ‘मी कुठल्याही फळाची अपेक्षा न करता फक्त मेहनत करत राहिलो. मी कधीही मुख्यमंत्री व्हावं, म्हणून हे काम केलं नाही.’ तत्पूर्वी बोलताना शिंदे म्हणाले की, त्यांनी दीड दिवसांच्या गणपतीत किमान 250 लोकांच्या घरी भेट दिली आणि अजूनही या भेटी सुरु असल्याचं ते म्हणाले.