पुणे – पुणे जिल्ह्यातील पुरंदर येथे प्रस्तावित करण्यात आलेले आंतरराष्ट्रीय विमानतळ हे पूर्वी ठरलेल्या जागेवरच होणार आहे. या विमानतळाच्या सर्व परवानग्या या जुन्या जागेवरच्याच आहेत. त्यामुळे या विमानतळाची जागा बदलली जाणार नाही, असा निर्वाळा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी (ता.२) पुण्यात पत्रकारांशी बोलताना दिला. या विमानतळासाठी आवश्‍यक असलेली जागा संपादन करण्याचा आदेश विभागीय आयुक्त सौरभ राव यांना देण्यात येईल. असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

फडणवीस यांच्या या निर्वाळ्यामुळे पुणे जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या जागेबाबतचा संभ्रम आता दूर होणार आहे. पुणे जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय विमानतळाबाबत एका खासगी कंपनीकडून एक प्रस्ताव राज्य सरकारकडे प्राप्त झालेला आहे. मात्र या प्रस्तावावर अद्यापपर्यंत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. हा प्रस्ताव सादर केलेल्या खासगी कंपनीचे नाव मात्र त्यांनी सांगितले नाही.

अधिक वाचा  पुणे महापालिका ‘प्रशासकराज’ अधिकाऱ्यांची अनाधिकृत बांधकाम व्यावसायिक सलगी कायमच; एकीकडे मनाई दुसरीकडे ताबा देण्याची लगीनघाई 

राज्याच्या नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाच्या पुणे शहरातील नवीन इमारतीचे भूमीपूजन शुक्रवारी (ता.२) फडणवीस यांच्या हस्ते झाले. या भूमीपूजन कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी हा निर्वाळा दिला. पुणे जिल्ह्यातील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाबाबतचे अनेक वर्षांपासून भिजत घोंगडे कायम आहे. पूर्वनियोजनानुसार हे विमानतळ खेड तालुक्यात होणार होते. परंतु तेथील स्थानिकांनी विमानतळासाठी आवश्‍यक असणारी जागा देण्यास नकार दिला. या विमानतळाला आंदोलनाच्या माध्यमातून तीव्र विरोध केला. त्यामुळे सरकारने या विमानतळाची जागा बदलण्याचा निर्णय घेतला आणि त्यानुसार हेच विमानतळ पुरंदर तालुक्यात हलविले. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याच प्रस्तावित विमानतळाचे छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळ असे नामकरण केलेले आहे.

अधिक वाचा  एअरपोर्ट रोडवर अंदाधुंद गोळीबार, गोळ्या झाडून हायप्रोफाईल नेत्याची हत्या, शहरात खळबळ

दरम्यान, खेड तालुक्यातील शेतकऱ्यांप्रमाणेच पुरंदर तालुक्यातील शेतकऱ्यांनीही या विमानतळाला जमिनी देण्यास प्रथमपासून तीव्र विरोध सुरु केला होता. तेथील शेतकऱ्यांच्या विरोधामुळे तेथील जागेबाबत तांत्रिक अडचण निर्माण झाली होती. ही अडचण दूर करण्यासाठी याही विमानतळाची जागा बदलण्याचा प्रस्ताव तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने केंद्र सरकारला दिला होता. या प्रस्तावामुळे पुरंदरचे प्रस्तावित विमानतळसुद्धा बारामती तालुक्यात जाणार, अशी चर्चा सुरु झाली होती. या चर्चेला आता फडणवीस यांच्या निर्वाळ्यामुळे पूर्णविराम मिळू शकणार आहे.