मुंबई – तब्बल दोन वर्षानंतर गणेशोत्सव निर्बंधमुक्त होत आहे. त्यातच मुंबईतील लालबागचा राजाचा थाटच वेगळा. सर्व सेलिब्रेटी लालबागच्या राजाला आवर्जून जातात. शिवाय राजकीय नेत्यांनाही लालबागच्या दर्शनाची ओढ असते. लालबागचा राजा नवसाला पावणारा गणपती, अशी भाविकांची भावना आहे. मात्र याच राजाच्या दानपेटीत टाकलेलं एक पत्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालं असून पत्र वाचल्यानंतर लालबागचा राजाही गहिवरून जाईल, असं हे पत्र आहे.
कल्पना सुरेश कलमनी या दिवंगत युवतीने काढलेल्या चित्रासह एक पत्र बाप्पाच्या चरणी अर्पण करण्यात आलं.
पत्रात म्हटलं की, “कोरोना संकटानंतर लालबागचा राजा येत आहे, पण त्याच्या दर्शनाची आस असलेली माझी मुलगी आज आता या जगात नाही. 2019 साली लालबागच्या राजाच्या नवसाच्या रांगेत मी आणि माझी मुलगी आठ तास उभे होतो. रांग जराही पुढे न सरकल्याने तिचे पाय खूप दुखून रांगेत उभे राहणे अशक्य झाले. तेव्हा ती जवळ उभे असणाऱ्या सिक्युरिटी गार्डशी बोलायला गेली तिथे त्याने तिच्या मनाला लागेल अशी काहीतरी चुकीची भाषा वापरून विचित्र उत्तरे दिली. ते ऐकूनच संतापलेल्या माझ्या मुलीने मला रांगेतून बाहेर काढून दर्शनासाठी न थांबताच पहाटेच घरी परत नवी मुंबईला आणले तिचे मानसिक संतुलन बिघडले आणि त्याच दिवशी संध्याकाळी गळफास लावून तिने स्वतःला संपवले.
वरील कोपऱ्यातील चित्र माझ्या आर्किटेक्ट मुलीचे शेवटची आठवण ठरली, जे तिने नवसाचा रांगेत बसता यावे म्हणून काढले ते तिला राजाच्या पेटीत ठेवायचे होते. कार्यकारी मंडळ नवसाचे पेटीतील योग्य सूचनेप्रमाणे कृती नक्की करते हा तिचा विश्वास होता. ही तिची इच्छा शेवटची ठरली म्हणून आम्ही ते बाप्पाच्या चरणी वाहतो ती पूर्ण करण्यासाठी आपण आम्हाला यावर्षी नाहीतर पुढच्या वर्षी बाक किंवा खुर्च्या देऊ द्याल. तर तिच्या दिवंगत आत्म्याला शांती मिळेल अशी आमची भाबडी समजूत मुलीचे दुःखी आई-वडील बहीण.
याआधी अनेकदा लालबागचा राजा मंडळाच्या कार्यकर्त्यांची आरेरावी समोर आली आहे. त्याचे व्हिडीओ देखील समोर आले आहेत. त्यामुळे अनेकदा लालबागचा राजा व्यवस्थापनावर टीकाही करण्यात आली आहे.