पुणे : पुण्यातील गणेशोत्सवासाठी आता पीएमपीएल प्रशासन देखील सज्ज झालेले पाहायला मिळत आहे. पुण्यातील गणेशोत्सव पाहण्यासाठी राज्यभरातून अनेक भाविक पुण्यात येत असतात आणि त्याच भाविकांची तसेच पुणेकरांची गैरसोय होऊ नये म्हणून गणेशोत्सवाच्या काळात पीएमपीएमएल 822 इतक्या जादा बसेस सोडणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. या जादा बसेसचे पीएमपीएमएलकडून दोन टप्प्यात नियोजन करण्यात आले आहे. त्यातच पुण्यातली विसर्जन मिरवणूक पाहायला देखील अनेक जण येत असतात. त्यामुळे पीएमपीकडून विसर्जनाच्या दिवशी तब्बल 654 जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. तर इतर 168 बस या उद्या आणि परवा गणेश आगमनाच्या वेळी सोडण्यात येणार आहेत. प्रवाशांची गैरसोय होणार नाही, याची खबरदारी पीएमपी घेत असल्याचे दिसून येत आहे.
अतिरिक्त रक्कम मोजावी लागणार
विसर्जनाच्या दिवशी पीएमपीएमएलची बस सेवा ही पहाटेपर्यंत सुरू राहणार असून रात्रीच्या प्रवासाला मात्र प्रवाशांना 25% अतिरिक्त रक्कम मोजावी लागणार आहे. मागील दोन वर्ष कोरोनामुळे गणेशोत्सव सार्वजनिकरित्या मोठ्या प्रमाणावर साजरा झाला नाही. यंदा तो धुमधडाक्यात होत आहे. त्यामुळे गर्दीही वाढणार आहे. बाहेर गावाहून येणाऱ्यांची गर्दी पाहता त्यांची गैरसोय होऊ नये, याकरिता पीएमपी प्रशासन सज्ज झाले आहे.
बसस्थानकांवरही गर्दी
बाहेर गावाहून येणाऱ्या असो की पुणेकर. कोणत्याही प्रवाशाची गैरसोय होऊ नये, याकरिता पहाटेपर्यंत जादा बसेस सोडण्यात येणार असल्याचे पीएमपी प्रशासनाने सांगितले आहे. दरम्यान, उद्या गणरायाचे आगमन होणार असून त्यानिमित्त बसस्थानकांवर देखील मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत आहे. बाहेरगावी जाणारे तसेच येणाऱ्या प्रवाशांमुळे पुण्यातील बसस्थानके तसेच पीएमपीलादेखील गर्दी झाल्याचे दिसत आहे.
एसटीचीही तयारी
पीएमपीप्रमाणेत एसटीनेही जादा बसेस सोडण्याचा निर्णय घेतला. वाढली गर्दी पाहता ही निर्णय घेण्यात आला. गणेशोत्सवासाठी पुणे आणि मुंबईतून हजारो चाकरमानी हे कोकणात जात असतात. त्यासाठी या गणेशोत्सवासाठी जवळपास 356 जादा बसेस सोडण्याचा निर्णय पुणे एसटी महामंडळाने घेतला आहे