मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज मुंबई सत्र न्यायालयात पुन्हा खाजगी रुग्णालयात उपचार करण्याची परवानगी मिळविण्यासाठी अर्ज केला आहे. मात्र या अर्जावर येणाऱ्या 6 सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे. अनिल देशमुख हे सध्या आर्थर रोड कारागृहामध्ये न्यायालयीन कोठडीत आहे. देशमुख यांनी आज मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए न्यायाधीश राहुल रोकडे यांच्यासमोर स्वतः युक्तिवाद केला. “मी कारागृहामध्ये चार वेळा चक्कर येऊन पडलो आहे. माझी प्रकृती अद्यापही स्थिर नाही. मला खाजगी रुग्णालयात उपचाराकरीता परवानगी देण्यात यावी, अशी मागणी देशमुख यांनी स्वतः आज न्यायालयासमोर युक्तिवाद करताना केली आहे.
अनिल देशमुखांच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ
अनिल देशमुख यांची 100 कोटी वसुली प्रकरणात आज न्यायालयीन कोठडी संपत आहे. त्यांना रिमांडसाठी कोर्टासमोर हजर करण्यात आलं होतं. त्यांच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ करण्यात आली आहे.
देशमुखांचा स्वतः न्यायाधीशांसमोर युक्तीवाद
मात्र यावेळी विशेष सत्र न्यायाधीश राहुल रोकडे यांच्यासमोर स्वतः देशमुख यांनी युक्तिवाद केला. माझी प्रकृती गेल्या अनेक दिवसांपासून ठीक नाही. मी आतापर्यंत चार वेळा कारागृहामध्ये चक्कर येऊन पडलो आहे. यापूर्वी देखील माझ्या हाताला मोठ्या प्रमाणात दुखापत झाली होती. बाथरूममध्ये पडल्यानंतर नवाब मलिक यांनी जेल प्रशासनाला ताबडतोब माहिती दिल्यानंतर माझ्यावर उपचार करण्यात आले होते.
देशमुखांच्या अर्जावर 6 सप्टेंबर रोजी सुनावणी
खाजगी रुग्णालयामध्ये उपचार करण्याकरीता न्यायालयाने परवानगी द्यावी, अशी मागणी देशमुख यांनी न्यायालयासमोर आज केली. यावर यासंदर्भात तुम्ही कोर्टासमोर लेखी अर्ज करा, असे न्यायाधीश राहुल रोकडे यांनी सांगितले. मात्र त्यानंतर अनिल देशमुख यांच्या वतीने कोर्टासमोर लेखी अर्ज दाखल करण्यात आला. अनिल देशमुख यांनी आज केलेल्या अर्जावर 6 सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे.
जेष्ठ वकील विक्रम चौधरींनीही मेडिकल ग्राऊंडवर जामीनाची केली होती मागणी
यापूर्वी अनिल देशमुख यांच्या मुंबई उच्च न्यायालयातील जामीन अर्जावर सुनावणी दरम्यान जेष्ठ वकिल विक्रम चौधरी यांनी देखील न्यायालयासमोर युक्तिवाद करताना म्हटले होते की, अनिल देशमुख यांचे वय वाढत असल्याने त्यांना असलेले आजार देखील वाढत आहेत. अनिल देशमुख यांना अनेक प्रकारचे आजार असल्याने त्यांना मेडिकल ग्राउंडवर जामीन देण्यात यावे. त्यावेळी देखील ईडीच्या वतीने अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जाला मुंबई हायकोर्टात विरोध करण्यात आला होता. मात्र अद्याप या जामीन अर्जावर अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांचा युक्तिवाद बाकी आहे.
मुंबई सत्र न्यायालयात अनिल देशमुख तर्फे यापूर्वी ही खाजगी रुग्णालयात उपचार करण्याची परवानगी मागण्यात आली होती. मात्र तेव्हा ईडी तर्फे त्यांना खाजगी रुग्णालयात उपचार करण्याची परवानगी देण्याचा विरोध करण्यात आला होता. ईडीतर्फे कोर्टासमोर असं उत्तर देण्यात आलं होतं की, अनिल देशमुख यांना हवे असलेले उपचार जेजे रुग्णालयात उपलब्ध आहेत. मात्र त्यावेळी त्यांना स्वतःच्या पसंतीचा डॉक्टरचा सल्ला घेण्याची परवानगी देत, खाजगी रुग्णालयात उपचार करण्याची परवानगी कोर्टाने नाकारली होती.