शिंदे गटाकडून शिवसेनेचा ‘दसरा मेळावा’ हायजॅक करण्याच्या तयारी सुरू झाल्याची माहिती मिळत आहे. उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. मुंबई महापालिकेकडून (BMC) मेळाव्याला परवानगी मिळावी, यासाठी शिवसेनेनं अर्ज दाखल केला असताना, महापालिकेनं मात्र हात आखडता घेतल्याची माहिती मिळत आहे.

शिवसेनेचे प्रबळ नेते एकनाथ शिंदे यांनी काही आमदारांसह बंड केला आणि शिवसेनेत उभी फूट पडली. एकापाठोपाठ एक आमदार, खासदार, नगरसेवक शिंदे गटात सहभागी झाले. त्यानंतर आमचीच खरी शिवसेना हा दावा शिंदे गटाकडून केला जाऊ लागला. राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठ्या बंडानं अख्खा महाराष्ट्र हादरला. शिंदे गटाकडून दिवसागणिक नवनवे दावे होऊ लागले. काहीच दिवसांत हा वाद सर्वोच्च न्यायालयात पोहोचला. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. अशातच आता शिवसनेसाठी महत्त्वाचा असलेला दसरा मेळावाच हिसकावण्याचा शिंदे गटाचा प्रयत्न असल्याची माहिती मिळत आहे.

अधिक वाचा  जयंत पाटील खरंच राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देणार? स्वत:च माहिती देत म्हणाले….

शिवसेनेच्या 50व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित एका कार्यक्रमादरम्यान बोलताना उद्धव ठाकरे यांनी यंदाचा दसरा मेळावा जाहीरपणे शिवतीर्थावरच घेणार, असा विश्वास शिवसैनिकांना दिला होता. गेल्या दोन वर्षांत दसरा मेळाव्याचं जाहीर आयोजन करण्यात आलं नव्हतं. गेल्या वर्षी तर काही प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडला होता. सध्या राज्यात कोरोनावरील निर्बंध उठवले असून सर्व सण-उत्सव, राजकीय कार्यक्रमांवरील निर्बंध उठवण्यात आले आहेत. त्यामुळे यंदा शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यात येणार असल्याचं उद्धव ठाकरेंनी जाहीर केलं आहे.

दसरा मेळाव्याला परवानगी मिळवण्यासाठी शिवसेनेकडून मुंबई महानगरपालिकेकडे अर्ज करण्यात आला आहे. पण अद्याप शिवसेनेला कोणतीही परवानगी देण्यात आली नसल्याची माहिती मिळत आहे. शिंदे गटाकडून वारंवार शिवसेना पक्ष, पक्षाचं चिन्ह यांवर दावा केला जात आहे. शिवसेना नेमकी कोणाची? हे प्रकरण सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. अशातच आता शिंदे गटाकडून शिवसेनेचा दसरा मेळावाही हायजॅक होणार का? अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगल्याचं पाहायला मिळत आहे.

अधिक वाचा  सरपंच हत्या प्रकरणानंतर पोलिसांवरही जातीवादीचे आरोप पोलीस अधीक्षकांचा निर्णय: नो पाटील, नो देसाई, आता फक्त…