मुंबई : राज्यात शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत येताच सगळीच राजकीय समीकरणं बदलून गेली आहेत. महाविकास आघाडी सरकार काळात राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या नियुक्तीच्या यादीवरुन राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार असा संघर्ष पाहायला मिळाला होता. पण आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्याकडून लवकरच १२ आमदारांच्या नावाची यादी राज्यपालांना पाठवण्यावर एकमत झालं आहे.

या १२ नावांसाठी शिंदे गट आणि भाजपमध्ये जोरदार लॅाबिंग सुरू असल्याची चर्चा सुरु झाली आहे. आमदारांचं संख्याबळ पाहता भाजपला १२ पैकी ८ तर शिंदेगटाला ४ जागा मिळण्याची शक्यता आहे. आता या १२ नावांमध्ये नेमकी कोणाला संधी द्यायची हा मोठा प्रश्न शिंदे फडणवीसांसमोर आहे. २०१९च्या निवडणुकीत विधानसभा निवडणुकीत पराभव झालेल्या तसेच शिंदे आणि फडणवीसांवर विश्वास ठेवत पक्षात आलेल्या लोकांना जास्त संधी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याशिवाय विधानपरिषदेची टर्म संपलेले अनेक आमदारही पुन्हा लॅाबिंग करत असल्याची माहिती आहे.

अधिक वाचा  अजित दादांच्या राष्ट्रवादीत मोठ्या नेत्यांचं इन्कमिंग, अमोल मिटकरींचे सूतोवाच, म्हणाले ‘अनेकजण भेटून गेले दादांना..’

महाविकास आघाडी सरकारने त्यांच्या कार्यकाळात राज्यपाल नियुक्त आमदारांसाठी 12 जणांची यादी दिली होती. मात्र, राज्यपालांनी ती शेवटपर्यंत मंजूर केली नाही. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देतानाही 12 आमदारांच्या मुद्द्यावरुन राज्यपालांना टोला लगावला होता. आता ही नावं कधी पाठवली जाणार आणि कोणाकोणाला संधी मिळणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

– शिंदे गटातील या संभाव्य नावांची यादी

रामदास कदम

विजय बापु शिवतारे

आनंदराव अडसुळ किंवा अभिजित अडसुळ

अर्जुन खोतकर

नरेश मस्के

चंद्रकांत रघुवंशी