कॅन्सर सारख्या दुर्धर आजाराने मृत्युशय्येवर असलेल्या आपल्या जिवलग मित्राची अखेरची इच्छा पूर्ण करत बारामती तालुक्यातील माळेगाव येथील मित्रांनी आपल्या मित्रत्वाचे अनोखे दर्शन घडविले आहे. मुलीच्या लग्नानंतर दुसऱ्याच दिवशी शिवाजी यांचे निधन झाल्याने माळेगाव आणि परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. माळेगाव येथील शिवाजी रामचंद्र तावरे (वय-५२) यांच्यावर बारामतीतील एका खासगी रुग्णालयात कॅन्सरवरील उपचार सुरु होते. त्यातच काविळ झाल्याने त्यांची तब्येत फारच खालावली होती. त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी त्यांच्याकडे फार वेळ नसल्याने त्यांची अंतिम इच्छा पूर्ण करा असं कुटुंब आणि मित्रांना सांगितलं.

अधिक वाचा  अनिल देशमुखांचे पुत्र ऋषीकेश यांना मोठा दिलासा; कोर्टाकडून जामीन

“माझ्या डोळ्या देखत दीदीचं (मुलीचं) लग्न व्हावं… मग.. मी डोळे मिटून घेईन….”, अशी अखेरची इच्छा शिवाजी तावरे यांनी बोलून दाखवली. लागलीच मित्रांनी वर शोधण्यास सुरुवात केली. याकामी माजी सरपंच दीपक तावरे, माजी सभापती अविनाश गोफणे, डॉ.राजेंद्र सस्ते, महमंद शेख, शरिफ बागवान यांची भूमिका महत्वाची ठरली. मुलगी शिवानी आणि बारामती तालुक्यातीलच पाहुणेवाडी येथील वैभव जराड यांच्याशी ९ ऑगस्ट रोजी विवाह पार पडला. यावेळी स्ट्रेचरवर शिवाजी तावरे हे लग्नाला उपस्थित राहिले.

मुलीच्या चेहऱ्यावर हात फिरवत माझी मुलगी खूप गुणाची आहे, तुझे कल्याण करेल, असे जावई वैभव याला म्हणून दोघांना आशीर्वाद दिले. हा आनंद सोहळा पाहिल्यानंतर शिवाजी तावरे यांना पुन्हा खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांनंतर दुसऱ्याच दिवशी दुपारी उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली.