पुणे : मंत्र्यांची सही न होताच सचिव निर्णय घेणार असतील तर मुख्य सचिवांना सर्व अधिकार देऊन मुख्यमंत्र्यांनीही…. मग काय सगळं आबादी आबादच आहे. प्रशासन जर या पद्धतीने चालणार असेल तर अवघड आहे. असा निर्णय झाला असेल तर ते महाराष्ट्राचे दुर्दैव आहे आणि एकनाथराव शिंदे तुम्ही या झालेल्या निर्णयाचे उत्तर महाराष्ट्रातील जनतेला दिले पाहिजे, अशा शब्दांत सचिवांना मंत्र्यांचे अधिकार देण्याबाबतच्या निर्णयावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी टीका केली.

पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत अजित पवार बोलत होते. त्यावेळी त्यांनी सचिवांना मंत्र्यांचे अधिकार देण्याच्या निर्णयाचा समाचार घेतला. ते म्हणाले की, लोकांमधून निवडून आलेल्या आमदारांचा मंत्रिमंडळात समावेश करायचा नाही आणि अधिकाऱ्यांना मंत्र्यांचे अधिकार द्यायचे. राज्यात मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अशा प्रकारची परिस्थिती कोणावरही आलेली नव्हती. या निर्णयाबाबत मला माहिती नाही. पण, असा निर्णय झाला असेल तर ते महाराष्ट्राचे दुर्दैव आहे आणि एकनाथराव शिंदे तुम्ही या झालेल्या निर्णयाचे उत्तर द्या, कारण ते महाराष्ट्रातील जनतेला कळले पाहिजे.

अधिक वाचा  कीर्तनकारांनी 5 हजार जास्त घेतले की…इंदुरीकर महाराजांनी असे घेतले फैलावर

राज्यातील कायदा सुव्यवस्थेच्या स्थितीवरही अजित पवार यांनी कडक शब्दांत ताशेरे ओढले. ते म्हणाले की, भंडाऱ्यामध्ये जी घटना घडली आहे, तसाच पद्धतीचा प्रकार मावळ तालुक्यातील लोणावळ्याजवळ घडला आहे. शेजारच्या एका मुलाने चॉकलेटचे आमिष दाखवून मुलीवर बलात्कार केला. त्यानंतर तिचा गळा चिरून खून केला. हे सर्व त्या मुलाच्या घरच्यांना माहिती होते. ती मुलगी गायब असल्याची त्या कुटुंबात चर्चा व्हायची, त्यावेळी हे मायलेक त्या ठिकाणी जाऊन बसायचे. त्यानंतर पोलिसांनी यंत्रणांना टाईट केल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे. मात्र, या घटनेत निष्पाप मुलीला आपला जीव गमावावा लागला आहे. आमचं म्हणणं हेच आहे की या घटना रोखण्यासाठी गृहमंत्री, गृहराज्यमंत्री पोलिस आदेश देण्यासाठी असतात. मात्र, सध्या मंत्रीमंडळच अस्तित्वात नसल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

अधिक वाचा  राष्ट्रवादीनं साताऱ्यावरील आग्रह सोडला? “सातारा सोडतो पण त्या बदल्यात…”

एकीकडे आमचे शेतकरी आत्महत्या करत आहेत, त्यांच्याकडे बघायला कोणी वाली नाही. निष्पाप मुलींना संपवण्याचे काम काही नराधम करत आहेत. त्यांचं एवढं धाडस कसं वाढलं आहे, हे कळायला मार्ग नाही. भंडाऱ्यातील घटनेप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली आहे. त्या संबंधित महिलेला भंडारा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या घटना आहेत. कोणीही राज्यकर्ते असले तरी कोणाच्याच काळात हे घडू नये. पण, हे घडू नये यासाठी पोलिस खात्याचा दरारा, दबदबा असला पाहिजे, प्रशासनावर मंत्रीमंडळाची हुकमत असली पाहिजे. सध्या तीच नसल्यामुळे अशा प्रकारच्या गोष्टींना महाराष्ट्रातील निष्पाप लोकांना सामोरे जावे लागत आहे. यासाठीच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे का, याचेही उत्तर शिंदे, फडणवीसांनी महाराष्ट्राला दिले पाहिजे, अशा शब्दांत राज्यातील कायदा सुव्यवस्थेबाबत अजित पवारांनी टीका केली.