मुंबई : शिवसेनेच्या 40 आमदारांनी बंड पुकारल्यामुळे राज्य सरकार संकटात सापडलं आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आमदारांनी हे बंड पुकारलं आहे. या बंडात सुरुवातीला 20 ते 25 आमदार होते. त्यानंतर हळूहळू इतर आमदार शिंदे यांच्या गोटात जावून मिळाले. शिंदे यांचा आमदारांचा गट हा आसामच्या गुवाहाटी येथील रेडिसन हॉटेलमध्ये थांबला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विश्वासातील अनेक दिग्गज नेते या बंडात सहभागी झाले आहेत. या बंडाचं ज्यांनी नेतृत्व केले ते एकनाथ शिंदे हे ठाकरेंचे खूप जवळचे निकटवर्तीय मानले जात होते. त्यामुळे त्यांनी बंड पुकारल्यामुळे राज्यभरात आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. विशेष म्हणजे आणखी एक आश्चर्यकारक बामतीसमोर आली आहे. बंडखोर आमदारांवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत वारंवार प्रहार करताना दिसत आहेत. पण त्यांचे सख्खे भाऊ आमदार सुनील राऊत हे शिंदे गटात सहभागी होण्याच्या तयारीत आहे. ते शिंदे गटाच्या संपर्कात असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी ‘माध्यमांना’ दिली आहे.

अधिक वाचा  बिहारमध्ये मोठा भूकंप; भाजप सोडचिठ्ठीनंतर राजदसोबत पुन्हा सत्तेची तयारी

एकनाथ शिंदे गटातील खात्रीलायक सूत्रांनी खाजगी वाहिनीला याबाबत माहिती दिली आहे. संजय राऊत यांचे भाऊ सुनील राऊत हे बंडखोर आमदारांच्या गटात सामील होऊ इच्छित आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर त्यांना मंत्रिपद न मिळाल्याने ते नाराज झाल्याची बातमी समोर आली होती. त्यानंतर आज ते थेट शिंदे गटात सहभागी होणार असल्याची बातमी समोर आली आहे. त्यातून त्यांना मनातील धुसफूस दाखवून द्यायची आहे का? असा प्रश्न उपस्थित होतोय. विशेष म्हणजे संजय राऊत हे बंडखोर 40 आमदारांवर सडकून टीका करत आहेत. त्यांच्यावर प्रचंड हल्लाबोल करत आहेत. असं असताना त्यांचा सख्खा भाऊ शिंदे गटात सहभागी होण्याच्या तयारीत असल्याने शिवसेना घरातच फुटली की काय? असं चित्र आहे.

अधिक वाचा  शिंदे सरकारच्या निशाण्यावर माजी मंत्री अस्लम शेख,1000 कोटींच्या बेकायदा स्टुडिओवर कारवाईचे आदेश

दरम्यान, कालपर्यंत एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करणारे शिवसेनेचे नेते आणि उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत गुवाहाटीला पोहोचले आहेत. उदय सामंत नॉट रिचेबल आहेत. उदय सामंत हेदेखील शिंदे गटात सामील झालं असल्याचं सांगितलं जात आहे. सुरतहून विशेष विमानाने उदय सामंत गुवाहाटीला रवाना होणार असल्याचं सांगितलं जात आहे.

दुसरीकडे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी कोरोनावर मात करून आता राजभवनावर दाखल झाले आहे. त्यामुळे हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे. गुवाहाटीमधील आमदार येत्या 48 तासात मुंबईमध्ये परतणार असल्याची माहिती समोर आली आहे. आज रात्री किंवा उद्या रात्री सर्व आमदार मुंबईत दाखल होणार आहे. शिंदे समर्थकांना मुंबई विमानतळावर जमण्याच्या सुचना देण्यात आली आहे. मुंबई विमानतळाला देखील अलर्ट दिला गेला आहे. राज्यपाल आपला विशेषाधिकार वापरुन राज्यातील परिस्थितीचा आढावा घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. तर, शिंदे गटाच्या वकिलांची एक टीम हायकोर्ट आणि एक टीम सुप्रीम कोर्टामध्ये दाद मागण्याची तयारी करत आहे.