पुणे – महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व असलेल्या पु.ल. देशपांडे यांच्या संकल्पनेतून साकारलेले आणि मराठी संगीत रंगभूमीचे अध्वर्यू नारायणराव राजहंस उर्फ बालगंधर्व यांचे नाव असलेले बालगंधर्व रंगमंदिर म्हणजे नाट्यरसिक आणि कलाकारांसाठी पंढरीच. पुण्याच्या सांस्कृतिक ठेव्यातील देदीप्यमान तुरा असलेले बालगंधर्व रंगमंदिर आज (ता. २६) नाट्यसेवेची ५४ वर्षे पूर्ण करून ५५ व्या वर्षांत पदार्पण करत आहे. मात्र, त्याची महती आजही कायम आहे.

‘बालगंधर्व रंगमंदिराच्या कामाचे भूमिपूजन स्वतः बालगंधर्वांच्या हस्ते झाले होते, तर पुलंच्या दूरदृष्टीतून त्याचे बांधकाम झाले होते. त्यामुळे साहजिकच नाट्यप्रेमींचे या वास्तूशी जिव्हाळ्याचे नाते आहे. आजही तिथे नाटकाचा प्रयोग झाला, की महाराष्ट्रभर ते नाटक गाजते, असे रंगकर्मी मानतात. बालगंधर्वांचे तेथील तैलचित्र पाहून तेच आपल्याला आशीर्वाद देत आहेत, अशी रंगकर्मींची भावना असते. त्यामुळे बालगंधर्व रंगमंदिराचे स्थान इतर नाट्यगृहांपेक्षा दशांगुळे वरच आहे,’ असे बालगंधर्वांच्या नातसून अनुराधा राजहंस यांनी सांगितले. रंगमंदिराच्या उद्‍घाटनावेळी ग. दि. माडगूळकर यांनी काव्य रचले होते. ‘स्वये लाडक्या गंधर्वा हाती कोनशिला या वास्तूची स्थापियली होती, नगरवासीयांनी आता जसे सांभाळणे, उभ्या भारता भूषण व्हावे, असे आमुचे पुणे’, अशा ओळी त्यात होत्या. याच ओळी आजही खऱ्या ठरत आहेत, असे राजहंस म्हणाल्या.

अधिक वाचा  पुण्यात इथं नाश्ताच्या खर्चात कपडे मिळतात; महागाईत खिशाचा विचार करणारं ठिकाण!

‘बालगंधर्व रंगमंदिरासारख्या सुविधा इतर कुठल्याही नाट्यगृहात नाहीत. बालगंधर्वमधील विंगेत स्पेस आहेत. नाटकाचा सेट बसमधून उतरवून थेट रंगमंचापर्यंत नेण्यासाठी सोयी आहेत. मेकअप रुम ते रंगमंचपर्यंतचे अंतर अतिशय कमी आहे. त्यामुळे नटांना चटकन स्टेजवर जाता येते. यासह मध्यवर्ती भागात नाट्यगृह असल्याचा फायदा आहेच. त्यामुळे भावना जोडलेल्या असल्या तरी या तांत्रिक बलस्थानांमुळेही रंगकर्मींना हे नाट्यगृह जवळचे वाटते,’ असे रंगकर्मी दीपक रेगे यांनी सांगितले. याच कारणांमुळे बालगंधर्व रंगमंदिराबाहेर कायमच ‘हाऊसफुल्ल’चा बोर्ड झळकत राहील, असा विश्वास रंगकर्मी व्यक्त करतात.