नवी दिल्ली : नुकत्याच साजऱ्या झालेल्या जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर भारताची चिंता वाढविणारी बातमी आहे. जगभरातील १८० देशांचा २०२२ या वर्षासाठीचा पर्यावरण कामगिरी निर्देशांक अमेरिकेतील संस्थांनी जाहीर केला असून या यादीत भारत तळाला आहे. डेन्मार्कने सर्वोत्तम कामगिरी करत पहिला क्रमांक पटकावला आहे. तर ब्रिटन, फिनलंड अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
अमेरिकेतील येल येथील पर्यावरण कायदा आणि धोरणासाठीचे केंद्र, आंतरराष्ट्रीय पृथ्वी विज्ञान माहिती नेटवर्क केंद्र आणि कोलंबिया विद्यापीठाने ही यादी नुकतीच जाहीर केली. या यादीत भारत निचांकी १८.९ गुण मिळवत सर्वांत शेवटच्या म्हणजे १८० व्या क्रमांकावर आहे. भारतासह यादीत तळात असणाऱ्या म्यानमार, पाकिस्तान आदी देशांनी शाश्वत विकासापेक्षा आर्थिक विकासाला महत्त्व दिले आहे. त्याचप्रमाणे, नागरी अशांतता आणि इतर संकटांचाही हे देश सामना करत आहेत. भारतात हवेचा दर्जा धोकादायक बनत असून वेगाने वाढणाऱ्या हरितगृह वायू उत्सर्जनामुळे देश पहिल्यांदाच यादीत शेवटचा क्रमांक गेला आहे, असेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे. चीन २८.४ गुणांसह १६१ व्या क्रमांकावर आहे. भारत व चीन हे दोन्ही देश २०५० पर्यंत सर्वाधिक हरितगृह वायू उत्सर्जन करणारे देश बनतील, असा अंदाजही अहवालात वर्तविण्यात आला आहे.
या यादीत अमेरिका ४३ व्या क्रमांकावर असून पाश्चिमात्य देशांतील २२ श्रीमंत देशांत अमेरिका २० व्या क्रमांकावर आहे. केवळ डेन्मार्क, ब्रिटन हेच देश २०५० पर्यंत हरितगृह वायू उत्सर्जन कमी करण्याच्या उद्दिष्टांपर्यंत पोचू शकतील. याऊलट पर्यावरण क्षेत्रात इतर अनेक देशांचा प्रवास चुकीच्या दिशेने होत असून चीन, भारत, रशिया या प्रमुख देशांत हरितगृह वायू उत्सर्जन वेगाने वाढत आहे. सध्याचीच परिस्थिती यापुढेही राहिली तर २०५० पर्यंत हरितगृह वायू उत्सर्जनात चीन, भारत, अमेरिका आणि रशिया याच चार देशांचा वाटा निम्मा असेल, असेही अहवालात म्हटले आहे.
पर्यावरण निर्देशांक जास्त असणारे देश
डेन्मार्क, ब्रिटन, फिनलंड
पर्यावरण निर्देशांक कमी असणारे देश
भारत, म्यानमार , व्हिएतनाम
निर्देशांक कसा काढला?
पर्यावरण कामगिरी निर्देशांकातून जगभरातील शाश्वततेसंदर्भात माहिती मिळते. पर्यावरणविषयक महत्त्वाच्या ११ श्रेणींतील कामगिरीविषयक ४० सूचकांचा वापर करत प्रत्येक देशांचा असा निर्देशांक काढण्यात आला. त्याचप्रमाणे, हवामान बदल कामगिरी, पर्यावरणीय आरोग्य आणि परिसंस्थेचाही आधार घेण्यात आला. हे निर्देशांक संबंधित देश आपल्या पर्यावरण धोरण लक्ष्याच्या किती जवळ आहेत, याविषयी माहिती देतात.