पुणे : पुण्यातील मोठे बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांना सीबीआयने अटक केली आहे. येस बँक-डीएचएफएल प्रकरणात सीबीआयने ही कारवाई केली आहे. ३० एप्रिल रोजी भोसले यांच्या पुण्यातील एबीआयएल या कार्यालयावर सीबीआयकडून छापा टाकण्यात आला होता. त्यानंतर त्यांना आज अटक करण्यात आली आहे. अविनाश भोसले हे काँग्रेस नेते आणि मंत्री विश्वजीत कदम यांचे सासरे आहेत.

अविनाश भोसले यांना सक्त वसुली संचालनालयाने गेल्या वर्षी दणका दिला होता. त्यांची ४०.३४ कोटी रुपये किंमतीची स्थावर मालमत्ता जप्त करण्यात आली होती. विदेशी मुद्रा प्रबंधन अधिनियमांतर्गत पुण्यातील शिवाजीनगर येथील गणेशखिंडमध्ये असलेल्या त्यांच्या एबीआयएल कंपनीच्या मुख्यालयावर ईडीने ही कारवाई केली होती. त्यानंतर ३० एप्रिल रोजी सीबीआयने त्यांच्याशी संबंधित संपत्तींवर छापेमारी केली होती.

अधिक वाचा  मराठा आंदोलनाचा फटका नको ‘आपली’ मते सकाळीच उरका! राज्यभर मंदिरात बैठका घ्या या ३६ संघटना सक्रिय

मागील काही वर्षांपासून येस बॅंक व डीएचएफएल प्रकरणाचा तपास “सीबीआय’कडून सुरु आहे. त्यांनी यापुर्वी उद्योजक संजय छाब्रिया यांना अटक केली आहे, तर विनोद गोएंका व शाहीद बलवा यांच्यावरही कारवाई केली आहे. दरम्यान, याच बॅंक गैरव्यवहार प्रकरणामध्ये भोसले यांचेही नाव पुढे आले होते. त्यानुसार, “सीबीआय’कडून भोसले यांचा तपास सुरु होता. भोसले यांचे घर व काही मालमत्तांवर एप्रिल महिन्यात “सीबीआय’ने छापे टाकून काही मोठ्या प्रमाणात झाडाझडती घेतली होती. त्याचवेळी त्यांच्या मालमत्तांमधून महत्वाची कागदपत्रेही त्यांनी जप्त केली होती.

भोसले हे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक, उद्योजक असून त्यांचा मुंबई व पुण्यात बांधखाम व्यवसाय मोठ्या प्रमाणात आहे. शहरातील भोसलेनगर व डेक्कन जिमखाना परिसरात त्यांची प्रशस्त कार्यालये आहेत. तर पाषाणमध्ये येथे भोसले यांचे आलिशान निवासस्थान आहे. भोसले यांना यापूर्वीही विदेशातून कर चुकवून मौल्यवान चीजवस्तू घेऊन येताना सीमाशुल्क विभागाने विमानतळावर ताब्यात घेतले होते. दरम्यान, सीबीआयने गुरुवारी सायंकाळी भोसले यांना त्यांच्या घरातुन अटक केली.