मुंबई : माजी खासदार संभाजीराजे छत्रपती राज्यसभा निवडणुकीतून माघार घेणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. ते उद्या पत्रकार परिषद घेवून याबाबत अधिकृत घोषणा करण्याची शक्यता आहे. उमेदवारी अर्ज भरण्यास अवघे काही दिवस शिल्लक राहिले असतानाही अपक्ष आमदार महेश बालदी आणि मनसे वगळता अन्य भाजप, महाविकास आघाडी किंवा इतर अपक्ष आमदार यांच्यापैकी कोणीही संभाजीराजे छत्रपती यांना पाठिंबा जाहीर केलेला नाही. त्यामुळे उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वीच त्यांच्यावर माघार घेण्याची नामुष्की ओढावली आहे. याशिवाय राज्यसभा निवडणुकीचा अर्ज दाखल करण्यासाठी लागणारे १० आमदारांचे अनुमोदनही संभाजीराजे छत्रपती यांना जमवता आलेले नाही.
संभाजीराजे छत्रपती यांनी १२ मे रोजी पुण्यात पत्रकार परिषद घेवून राज्यसभेच्या सहाव्या जागेवर अपक्ष म्हणून उतरण्याची घोषणा केली होती. यासाठी त्यांनी भाजप आणि महाविकास आघाडीकडे पाठिंबा मागितला होता. तसेच अपक्ष आमदारांना अनुमोदन देण्याचे आवाहनही केले होते. मात्र प्रत्यक्षात सहावी जागा लढविण्यासाठी लागणारे संख्याबळ महाविकास आघाडीत शिवसेनेच्या मागे असल्याने त्यांनी अपक्ष अर्ज दाखल करत शिवसेना पुरस्कृत उमेदवार होण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिला होता.
मात्र शिवसेनेने संभाजीराजे यांना शिवसेना पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून अर्ज भरण्याची अट ठेवली. परिणामी संभाजीराजे छत्रपती यांची कोंडी झाली. पण त्यांनी शिवसेनेत प्रवेश करण्यास नकार देवून अपक्ष निवडणूक लढविण्याची भूमिका कायम ठेवली. अखेरीस शिवसेनेने सहावा उमेदवार म्हणून संजय पवार यांच्या नावाची घोषणा केली अन् आज त्यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्या जोडीने उमेदवारी अर्ज दाखल केला. एवढेच नव्हे तर राज्यसभा निवडणुकीचा अर्ज दाखल करण्यासाठी लागणारे १० आमदारांचे अनुमोदनही संभाजीराजे छत्रपती यांना जमवता आले नाही. त्यामुळे ते राज्यसभेच्या उमेदवारीसाठी अर्ज न भरता लवकरच माघार घेणार असल्याची माहिती आहे.
दरम्यान संभाजीराजे यांनी गुरूवारी फेसबुक व ट्विटरवर एक पोस्ट टाकली आहे. त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक झालेला त्यांचे छायाचित्र आहे. या पोस्टमध्ये संभाजीराजे म्हणतात की, ‘महाराज… तुमच्या नजरेतलं ‘स्वराज्य’ मला घडवायचंय… मी कटीबद्ध असेन तो तुमच्या विचारांशी… मी बांधील असेन तो फक्त जनतेशी…’ या तीन ओळींमध्ये त्यांनी राज्यसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आपली भूमिका मांडल्याची चर्चा आहे. संभाजीराजे यांची ही फेसबुक पोस्ट व्हायरल झाली आहे. तासाभरातच 10 हजारांहून अधिक लोकांनी ही पोस्ट लाईक केली असून जवळपास 500 हून अधिक कमेंट आल्या आहेत. तसेच 200 जणांनी ही पोस्ट शेअर केली आहे. ट्विटरवरही ही पोस्ट व्हायरल झाली आहे.