मुंबई : राज्यसभा निवडणुकीच्या चर्चांनी सध्या राजकीय वर्तुळात जोर पकडला आहे. यात ६ पैकी ५ जागांवर भाजपचे २, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचा प्रत्येकी १ खासदार निवडून येवू शकतो. त्यामुळे उर्वरित सहाव्या जागेसाठी चुरस निर्माण झाली आहे. महाविकास आघाडीतून सहावी जागा शिवसेना लढविणार असल्याचे मंत्री अनिल परब आणि शिवसेना नेते संजय राऊत यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे शिवसेनेचे दोन खासदार निवडून जाण्याची शक्यता आहे.

सहाव्या जागेसाठी माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी यापूर्वी स्वतःची उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र अद्याप कोणत्याही पक्षाने त्यांना पाठिंबा जाहीर केलेला नाही. तर महाविकास आघाडीकडून ही जागा शिवसेना लढविणार असल्याने शिवसेनेने उमेदवारीची घोषणा करण्यापूर्वीच संभाजीराजे यांना पक्ष प्रवेशाची ऑफर दिली होती, ती ऑफर अद्यापही कायम असल्याचे सांगण्यात येत आहे.

अधिक वाचा  ठरलं! प्रकाश आंबेडकर निवडणुकीच्या रिंगणात उतरणार, ‘या’ मतदारसंघातून लढणार

मात्र संभाजीराजे यांनी शिवसेनेत प्रवेश न केल्यास शिवसेनेतून राज्यसभेचे तिकीट कोणाला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यापूर्वी शिवसेनेतून शिरुरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचे नाव चर्चेत होते. पण ते नाव आता मागे पडले असून शिवसेनेतून अभिनेत्री उर्मिला मातोंडकर आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासार्ह आणि त्यांचे संजय मानले जाणारे शिवसेना सचिव मिलींद नार्वेकर यांचे नाव चर्चेत आले आहे.

राज्यसभेत पक्षाची भूमिका मांडण्यासाठी एक चांगला चेहरा म्हणून उर्मिला मातोंडकर यांच्या नावाची चाचपणी सध्या सुरु आहे. शिवाय उर्मिला मातोंडकर या पक्षात आल्यनंतर शिवसेनेने त्यांचे नाव विधान परिषदेसाठी दिले आहे. पण राज्यपालांनी अजूनही ही सरकारने दिलेली नावं स्वीकारलेली नाहीत. त्यामुळे मातोंडकर यांना राज्यसभेवर संधी दिली जाण्याची शक्यता आहे. याबाबत लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पक्षातील नेत्यांशी चर्चा करून निर्णय घेणार आहेत.

अधिक वाचा  हार्दिक परत गेल्यानंतर जीत समोरील आव्हानं कोणती? सर्वाधिक चिंता ‘या’ गोष्टीची!

“आमची आकडे आणि मोड दोन्हीची तयारी!”
महाविकास आघाडीकडे सध्या १६९ आमदारांचे संख्याबळ आहे. यात शिवसेना ५६, राष्ट्रवादी काँग्रेस ५३, काँग्रेस ४४, बहुजन विकास आघाडी ३, समाजवादी पक्ष २, प्रहार १, स्वाभिमानी शेतकरी संघटना १, शेकाप १, अपक्ष ८ अशा आमदारांचा समावेश आहे. या संख्याबळानुसार शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी यांचा प्रत्येकी १ खासदार निवडून येवू शकतो. तर शिल्लक मत २७ आणि इतर अधिक अपक्ष असे १६ मिळून चौथा खासदार देखील निवडून येण्याची शक्यता आहे.