पुणे : आमदार अशोक पवार हे लवकरच शिरूर-हवेलीला ‘गूड न्यूज’ देण्याच्या तयारीत आहेत. या मतदार संघातील पाच ग्रामपंचायतींचे नगरपंचायत आणि नगर परिषदेत रुपांतरीत करण्याची हालचाली आमदार पवार यांनी सुरू केली आहे. शिरुरमधील शिक्रापूर आणि सणसवाडी या दोन गावांची, तर हवेलीतील उरुळी-कांचन, कदमवाकवस्ती व लोणी काळभोर तीन गावांची निवड केली आहे. उरुळी-कांचनला नगरपालिका आणि उर्वरीत चार गावांत नगरपंचायत व्हावी, यासाठी आमदारांनी पावले टाकली आहेत. जिल्हा नियोजन समितीचे सदस्य पंडीत दरेकर यांनी ही माहिती दिली.

शिरुर-हवेलीतील चार ग्रामपंचायतींचे नगरपंचायतींमध्ये तर, एका ग्रामपंचायतीचे नगरपरिषदेमध्ये रुपांतर करण्याची मागणी आमदार अशोक पवार यांनी नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांकडे नुकतीच केली आहे. या पाचही गावांच्या प्रस्तावांचा पाठपुरावा आमदार अशोक पवार करणार असून लोकसंख्या वाढीच्या दृष्टीने या पाचही गावांची विकासगती वाढण्याच्या दृष्टीने हे प्रस्ताव दिल्याचे दरेकर यांनी स्पष्ट केले.

अधिक वाचा  राष्ट्रवादीनं साताऱ्यावरील आग्रह सोडला? “सातारा सोडतो पण त्या बदल्यात…”

पुणे जिल्ह्यातील सर्वाधिक लोकसंख्या घनता दर वाढणारा तालुका म्हणून हवेली सर्वश्रुत आहे. त्याखालोखाल असलेला शिरुर तालुक्यातील पुण्याजवळील गावांची लोकसंख्या व लोकवस्ती वाढीचा दर मोठा असल्याने या गावांमध्ये ग्रामपंचायतींना गावविकास संभाळणे आणि गावविस्तारावर पूर्ण क्षमतेने काम करणे अवघड होत असल्याची स्थिती आहे. याच पार्श्वभूमिवर शिरुर-हवेली या दोन्ही तालुक्यातील व याच विधानसभा मतदार संघातील शिक्रापूर, सणसवाडी (ता.शिरुर) व उरुळी-कांचन, कदमवाकवस्ती तसेच लोणी-काळभोर (ता.हवेली) या पाच गावांतील नागरिकांच्या मागणीनुसार ग्रामपंचायतीचा दर्जा नगरपंचायत व नगर परिषदेत वर्ग करण्यासाठी आमदार अशोक पवार यांनी पाऊल उचलले आहे.

अधिक वाचा  महायुती-मविआसाठी ‘या’ जागा डोकेदुखी का ठरल्यात?घराणेशाही, राजकीय जातीय समीकरणे अजूनही गुंताचं!

उरुळी-कांचन ग्रामपंचायत हद्दीतील लोकसंख्या ३० हजार ३०५ च्या पलीकडे गेल्याने या गावासाठी नगरपरिषद व्हावी म्हणून तर शिक्रापूर (लोकसंख्या २० हजार २६३), सणसवाडी (लोकसंख्या १३ हजार ५४३) तर हवेलीतील कदमवाकवस्ती (लोकसंख्या १९ हजार ३२९) व लोणी-काळभोर (लोकसंख्या २२ हजार ३१८) या चार गावांसाठी नगरपरिषद व्हावी, अशा मागणीचा प्रस्ताव नगरविकास विभागाचे प्रधान सचिवांकडे आमदार अशोक पवार यांनी दिला आहे. या प्रस्तावाचा पाठपुरावा आमदार पवार स्वत: करणार आहेत. त्यामुळे शिरुर-हवेलीत लवकरच नगर परिषद व नगरपंचायतींची घोषणा होईल, असा आशावाद दरेकर यांनी व्यक्त केला.

अधिक वाचा  कोथरूड थोरात उद्यान्यामधील मोनोरेल प्रकल्प नागरिकांच्या इच्छेविरुद्ध होणार नाही: मनपा आयुक्त

शिक्रापूर ग्रामसभेत यापूर्वीच ठराव मंजूर

शिक्रापूर नगरपंचायत करण्याचा ठराव ग्रामसभेत यापूर्वीच मंजूर झाला आहे. नागरिकांचा पाठिंबाही या मागणीला आहे. गावचा विकासदर वाढवायचा असेल, तर असे प्रस्ताव तत्काळ मंजूर होणे पाचही गावांसाठी गरजेचे आहे, असे शिक्रापूरचे उपसरपंच मयूर करंजे यांनी सांगितले.