पुणे : राष्‍ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्‍याविषयी सोशल मीडियावर अपमानजनक आणि बदनामीकारक पोस्‍ट केल्‍याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्‍यात अभिनेत्री केतकी चितळे हिच्‍यावर काल (रविवारी) रात्री उशिरा गुन्‍हा नोंदविण्‍यात आला. याप्रकरणी राष्‍ट्रवादी महिला आघाडीच्‍या समिंद्रा बापूराव जाधव यांच्या तक्रारीवरुन हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. भारतीय दंड संहिता नुसार कलम 500, 501, 505, 153-A अशा कलमांतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

केतकी चितळेविरोधात हा दाखल झालेला बारावा गुन्हा आहे. यापूर्वी राज्यभरातील विविध पोलिस स्थानकात तिच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. केतकीवर सध्या अकोला, पवई-मुंबई, गोरेगाव-मुंबई, अमरावती, नाशिक, ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड, धुळे, सिंधुदुर्ग, उस्मनाबाद याठिकाणी देखील गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. केतकी चितळे सध्या याच आरोपांप्रकरणी ठाणे पोलिसांच्‍या कोठडीत असून तिला सत्र न्यायालयाने १८ मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

अधिक वाचा  लातूरच्या विकासासाठी ‘वाढपी हा आपल्या हक्काचा असला पाहिजे हक्काचा वाढपी दिल्लीत पाठवू…’ देशमुख

दरम्यान, केतकीवरील या गुन्ह्यानंतर आता ती देखील अॅड. गुणरत्त सदावर्ते यांच्या वाटेवर आहे का? असा सवाल विचारला जात आहे. कारण एसटी आंदोलनादरम्यान शरद पवार यांच्या सिल्वर ओक निवासस्थानी हल्ला करण्यासाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर विविध शहरांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या वशजांबद्दल अपमान कारक वक्तव्य करणे, कामगारांकडून पैसे गोळा केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना मुंबई, सातारा, कोल्हापूर अशा विविध पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

केतकी चितळे हिने शुक्रवारी (१३ मे) फेसबूकवरुन एका पोस्टच्या माध्यमातून शरद पवार यांच्यावर टीका केली. केतकी अनेकदा अशा पोस्ट करत असते. मात्र या पोस्टमध्ये तिने वापरलेल्या भाषेवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते संतप्त झाल्याचे चित्र आहे. या पोस्टच्या माध्यमतून टीका करताना तिने वापरलेल्या भाषेवरुन तिच्यावर टीका करण्यात येत असून ही भाषा अत्यंत खालच्या दर्जाची आणि गरळ ओकणारी असल्याची भावना कार्यकर्ते व्यक्त करत आहेत. ही पोस्‍ट व्‍हायरल झाल्‍यानंतर संपूर्ण राज्‍यात त्‍याचे तीव्र पडसाद उमटले. या पोस्‍टचा अनेक नागरिकांनी निषेध करत चितळेंविरोधात आपल्‍या भावना तीव्र शब्दांत व्‍यक्‍त केल्‍या होत्‍या.