पुणे – सारसबागेच्या चौपाटी येथे व्यावसायिकांकडून वारंवार नियमांचे उल्लंघन होत असल्याने आज (ता.१४) अतिक्रमण विभागाने सर्व ५३ दुकानांना सील ठोकले आहे. महापालिकेला आज सुट्टी असतानाही ही कारवाई केल्याने खळबळ उडाली आहे. पुण्यातील प्रमुख आकर्षणाचे स्थान असलेल्या सारसबागेत सध्या रोज किमान दोन ते तीन हजार नागरिक येतात. उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे सायंकाळी येथे मोठी गर्दी झालेली असते. सारसबागेच्या सिमाभिंतीला चौपाटी असून, तेथे फास्टफुड सेंटर, ज्यूस सेंटर, आइस्क्रीम पार्लर यासह खेळण्यांचे दुकाने थाटली आहेत. महापालिकेने येथे ५३ जणांना व्यवसाय करण्याची परवानगी दिली आहे. त्यांना स्टॉलच्या जागेपेक्षा जास्त जागा वापरता येत नाही. पण या व्यावसायिकांनी स्टॉलसमोर शेड मारून, फरशा टाकून स्टॉलचे रूपांतर हॉटेलमध्येच केले आहे. गेल्या अनेक वर्षापासून रस्त्यावर अतिक्रमण करून तेथे व्यवसाय सुरू असला तरी अतिक्रमण विभागाकडून कधीतरी कारवाई केली जाते. कधी कारवाई केली तरी राजकीय दबाव देखील येतो.

अधिक वाचा  संजय काकडेंची पोस्ट; 100 नगरसेवकांचीही न्यारी गोष्ट चंद्रकांतदादांचा स्व-अनुभव पुण्याची उमेदवारी धोक्यात?

महापालिकेने प्रशासक आल्यानंतर सारसबागेवर कारवाई करून स्टॉल समोरील सर्व अतिक्रमण पाडून टाकले होते. या ठिकाणी पुन्हा अतिक्रमण करू नये यासाठी प्रत्येक १५ दिवसांनी कारवाई केली जाईल, असे प्रशासनाने यापूर्वी स्पष्ट केले होते. पण याकडे दुर्लक्ष करत तेथे पुन्हा अतिक्रमण झाले आहे. त्यामुळे शनिवारी महापालिकेच्या पथकाने धडक कारवाई करत ५३ स्टॉलला सील केले आहे. त्यामुळे येथील व्यवसाय ठप्प झाले आहेत. दरम्यान, महापालिकेला सुट्टी असताना अतिक्रमण विभागाकडून कारवाई कशी काय झाली असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे, त्यावर सुट्टीच्या दिवशीही कारवाई करता येते असे स्पष्टीकरण प्रशासनाने दिले आहे.

अधिक वाचा  अरुणाचल प्रदेशातील टॅक्सीवाल्याने नागपूरकरांकडून पैसे घेतले नाही, कारण…नितीन गडकरी यांनी सांगितला तो किस्सा

‘महापालिकेने निश्‍चित केलेल्या जागेपैकी जास्त जागा वापरणे, शेड टाकून रस्त्यावरची जागा व्यापणे, पोट भाडेकरू ठेवणे यासह इतर नियमांचे उल्लंघन केले जात आहे. यापूर्वी वारंवार सूचना देऊनही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने ५३ दुकाने सील केले आहेत. महापालिकेला सुट्टी असली तरी अतिक्रमण विभागाकडून कारवाई केली जाते, सुट्टीचा संबंध नाही.’

– माधव जगताप, उपायुक्त, अतिक्रमण विभाग