त्रिपुरामध्ये बिप्लब देब यांनी राजीनामा दिल्यानंतर आता भाजपने माणिक साहा यांना नवे मुख्यमंत्री बनवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भाजपविधिमंडळ पक्षाच्या बैठकीत साहा यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे. बिप्लब देब यांच्या राजीनाम्यानंतर माणिक साहा यांच्या नावासह अनेक नावांची चर्चा सुरु होती. अखेर सर्व नेत्यांनी साहा यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड केली आहे. त्यानंतर आता ते लवकरच शपथ घेऊन मुख्यमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारतील.

हायकमांड भेटीनंतर बिप्लब देब यांनी दिला राजीनामा

यापूर्वी शुक्रवारी 13 मे रोजी बिप्लब देब यांनी दिल्लीत गृहमंत्री अमित शहा यांची भेट देखील घेतली होती. या बैठकीच्या अवघ्या 24 तासांनंतर 14 मे रोजी त्यांनी राज्यपालांकडे जाऊन राजीनामा देखील सादर केला होता. राजीनामा दिल्यानंतर बिप्लब देब यांनी हायकमांडच्या सांगण्यावरूनच हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याचबरोबर पक्ष आपल्यासाठी सर्वांत वरचा आहे आणि पक्षाकडून जी काही जबाबदारी येईल, ती आपण पार पाडू, असेही ते यावेळी म्हणाले.

अधिक वाचा  ज्ञानवापीवर कंगना राणौत म्हणाली- 'काशीमध्ये कणा कणात महादेव'

बिप्लब देब यांच्याबाबत संघटनेत होती नाराजी

बिप्लब देब यांच्याबाबत संघटनेत नाराजी वाढत चाचली होती. दोन आमदारांनीही देखील पक्ष सोडला होता. त्यांच्याविरोधात दिल्लीत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून तक्रारी करण्यात येत असल्याचे म्हटले जात होते. त्याचबरोबर आगामी विधानसभा निवडणुकीच्या रणनीतीबाबत भाजपला कोणताही धोका पत्करायचा नाही असे स्पष्ट दिसून येत आहे.

2018 मध्ये मुख्यमंत्री झाले, 2023 मध्ये होणार निवडणुका

2018 मध्ये बिप्लब देब मुख्यमंत्री झाले होते. त्रिपुरामध्ये पुढील वर्षी 2023 मध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. गुजरातच्या धर्तीवर त्रिपुरामध्ये मंत्री ते संघटनेत मोठे फेरबदल देखील होऊ शकतात. अशा स्थितीत भाजपने पक्ष मजबूत करण्यासाठी नव्या चेहऱ्याकडे राज्याची कमान सोपवण्याचा निर्णय घेतल्याचे म्हटले जात आहे.