टीव्ही अभिनेत्री केतकी चितळे ही वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असते. आता तिनं पुन्हा एकदा असाच प्रकार केला असून यावेळी तिनं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आक्षापार्ह शब्दात टीका केली आहे. केतकीने तिच्या फेसबूकवर एका व्यक्तीची कविता शेअर करत पवारांवर निशाणा साधला आहे.
केतकीच्या या पोस्टमुळे सोशल मीडियावर वादाला तोंड फुटलं आहे. राष्ट्रवादीच्या गोटातून नेत्यांनी संताप व्यक्त करत केतकीवर कारवाईची मागणी केली आहे. जितेंद्र आव्हाड यांनीही केतकीच्या कृत्यावर टीका केली. तिच्याविरोधात कळव्यात गुन्हा दाखल झाला होता. यानंतर आता पुण्यात राष्ट्रवादीच्या पदधिकऱ्यांनी केतकीच्या विरोधात तक्रार दाखल केल्याने तिला अटक होण्याची शक्यता आहे.
पुण्यात राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी सायबर सेलकडे तक्रार दिली आहे. केतकी चितळेने आपल्या फेसबूक पोस्टमध्ये शरद पवारांवर अत्यंत वाईट भाषेत टीका केली. नितीन भावे नावाच्या व्यक्तीच्या नावाने लिहिलेली ही पोस्ट आहे. अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टिका केल्याने केतकी विरोधात कळवा पोलीस ठाण्यामध्ये कलम 500, 505(2), 501 आणि 153 A अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादीचे पदाधिकारी स्वप्निल नेटके यांनी हा गुन्हा दाखल केला आहे. यानंतर पुण्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने शिवाजीनगर येथील सायबर सेलला तक्रार दाखल करण्यात आली आहे. शरद पवार यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट तसेच संत तुकाराम महाराज यांच्या अभंगाची छेडछाड केल्याप्रकरणी लवकर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.
केतकी चितळे नावाची ऐक बाई गेल्या काही दिवसांपासून अनेक वेळेला फेसबुक वरती आपल्या वैफल्यग्रस्त अवस्थेमुळे जेष्ठ नेत्यांबद्दल / राष्ट्रपुरषांबद्ददल आपली गरळ ओकत असते चित्रपट सृष्टीमध्ये काम न मिळाल्यामुळे ही बाई अत्यंत वैफल्यग्रस्त अवस्थेमध्ये कुठेतरी आपल्याला महत्त्व मिळावे म्हणून वारंवार महाराष्ट्राचा अपमान करत असते, असं राष्ट्रवादीचे प्रवक्ते प्रदीप देशमुख यांनी म्हटलंय.