पुणे : मोटारीत बेकायदा गर्भलिंग निदान केंद्र चालविण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार इंदापूर पोलीस तसेच वैद्यकीय विभागाने उघडकीस आणला. इंदापूर परिसरातील करण्यात आलेल्या कारवाईत तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडून मोटार आणि गर्भलिंग निदान यंत्रणा जप्त करण्यात आली आहे.

या प्रकरणी प्रवीण पोपटराव देशमुख (वय ३२, रा. राजळे, जि. सातारा), तौशिफ अहमद शेख (वय २०, दोघे रा. राजळे, जि. सातरा) तसेच एका विरोधात इंदापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. देशमुख एका रोगनिदान केंद्रात तंत्रज्ञ आहे. त्याच्याविरोधात गर्भधारण पूर्व प्रसव, पूर्व निदान तंत्रे (लिंग निवडीस प्रतिबंध) १९९४ च्या सुधारित २००३ कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक वाचा  वैष्णव मांदियाळीला कैक अडथळे; परी मनी आस पाहू रूप तुझं सावळे...

मोटारीत बेकायदा गर्भलिंग निदान केंद्र चालविले जात असल्याची माहिती इंदापूर येथील उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉ. संतोष खामकर यांना मिळाली. त्यानंतर डॉ. खामकर तसेच डॉ. एकनाथ चंदनशिवे, डॉ. श्रीकृष्ण खरमाटे, डॉ. अमोल खनावरे यांनी पोलिसांना याबाबतची माहिती दिली. वैद्यकीय तज्ज्ञ आणि पोलिसांच्या पथकाने मोटारीचा पाठलाग करण्यास सुरुवात केली.

इंदापुर-अकलूज रस्त्यावर दुचाकीवरून दाम्पत्य आले. दाम्पत्य मोटारीत बसले आणि मोटार भरधाव वेगाने निघाली. भांडगाव परिसरात एका ओढ्याजवळ मोटार थांबली. पोलीस आणि वैद्यकीय तज्ज्ञांचे पथक तेथे पोहचले. मोटारीची पाहणी करण्यात आली. तेव्हा मोटारीत बेकायदा गर्भलिंग निदान केंद्र चालविले जात असल्याचे दिसून आले. मोटारचालक शेख, देशमुख तसेच पत्नीची गर्भलिंग निदान चाचणी करण्यासाठी आलेल्या एकाला ताब्यात घेण्यात आले. तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

अधिक वाचा  संभाजीराजेंची पुरती कोंडी?; राजेंच्या हाती केवळ काही तासचं?

पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अतिरिक्त आयुक्त मिलिंद मोहिते, उपविभागीय अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. इंदापूर पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक सूर्यवंशी आणि पथक या करावाईत सहभागी झाले होते.