पुणे : आगामी महापालिका निवडणुकीसाठीची अंतिम प्रभाग रचना राज्य निवडणूक आयोगाकडून शुक्रवारी रात्री उशिरा जाहीर करण्यात आली. शहरातील किमान ३२ प्रभागात सुधारणा करण्यात आल्याचा दावा महापालिकेच्या निवडणूक शाखेकडून करण्यात आला.

महापालिकेची मुदत 14 मार्च रोजी संपली असली तरी राज्यातील ओबीसी आरक्षण कायम ठेवण्यासाठी न्यायालयात सुरू असलेल्या दाव्यांमुळे प्रभागरचना अंतिम झालेली नव्हती. तसेच राज्य शासनानेही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी आरक्षण कायम ठेवण्यासाठी 11 मार्च रोजी निवडणूक अधिकार आपल्याकडे घेण्याचा कायदा केल्याने प्रभागरचनेचे काम थांबले होते. अखेर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, महापालिकेची अंतिम प्रभागरचना 17 मेपर्यंत जाहीर करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले होते. त्यानुसार, आयोगाने अंतिम मान्यता दिल्यानंतर महापालिकेने तातडीने ही प्रभागरचना जाहीर केली आहे.

अधिक वाचा  "काँग्रेसची अवस्था आभाळ फाटल्यासारखी, ठिगळं तरी कुठे लावणार?", शिवसेनेलाही लागली चिंता

त्यानुसार, महापालिका निवडणुकीसाठी तीन सदस्यीय पद्धतीने एकुण 58 प्रभाग निश्‍चित होतात. यात 57 प्रभाग हे तीन नगरसेवकांचे आणि 1 प्रभाग हा 2 दोन नगरसेवकांचा आहे. एकूण 173 नगरसेवक असणार आहेत. त्यामुळे आता प्रभागरचना जाहीर झाल्यानंतर अनुसूचित जाती आणि जमातींचे आरक्षण जाहीर केले जाणार आहे. मात्र, प्रभागरचना जाहीर झाल्याने इच्छूकांना तयारीला लागण्याचा आणि आपला प्रभाग निश्‍चित करता येणार आहे. तर लोकसंख्येनुसार प्रभाग क्रमांक 9 येरवडा हा सर्वाधिक 71,390 लोकसंख्येचा असणार आहे. तर सर्वात कमी लोकसंख्येचा प्रभाग क्रमांक 13 असणार असून त्याची लोकसंख्या 31 हजार 869 आहे.