पुणे – भर उन्हाळ्यात ससून रुग्णालयाच्या शवागारातील  वातानुकूलित यंत्रणा  मरणासन्न झाली आहे. तेथे मृतदेह योग्य तापमानात ठेवले जात नाहीत. त्यामुळे मृतदेहांचे योग्य व्यवस्थापन होत नसल्याची माहिती पुढे आली आहे.

ससून रुग्णालयाच्या न्यायवैद्यकशास्त्र विभागाचे नवीन इमारतीमध्ये स्थलांतर होणार आहे. त्यामुळे तेथील शवागाराच्या देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत आहे. विभागाच्या स्थलांतरासाठी किमान एक महिना लागेल. तोपर्यंत सध्या सुरू असलेल्या शवागारातील तापमान योग्य पद्धतीने राखले न गेल्यास मृतदेह कुजण्याची भीती निर्माण झाली आहे.

राज्यात सर्वाधिक शवविच्छेदन ‘ससून’मधील शवागारात होतात. दरवर्षी होणाऱ्या शवविच्छेदनांची संख्या आता सात हजारांवर गेली आहे. देशातील सर्वाधिक शवविच्छेदन होणाऱ्या केंद्रांपैकी हे एक प्रमुख केंद्र आहे. शवागाराचे नवीन इमारतीत स्थलांतर होणार असल्याचे कारण पुढे करत दुर्लक्ष होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

अधिक वाचा  शहाळे महोत्सवात ५ हजार शहाळ्यांमध्ये श्रीमंत 'दगडूशेठ' गणपती बाप्पा विराजमान

रात्रभर मृतदेह रुग्णवाहिकेत!

रुग्णालयात उपचार सुरू असताना एका नातेवाइकांचा रात्री आठ वाजता मृत्यू झाला. त्यांचा अंत्यविधी दुसऱ्या दिवशी सकाळी करायचा ठरले. संबंधित रुग्णालयात शवागार नव्हते आणि रात्रभर मृतदेह ठेऊन घेण्यास ते रुग्णालय तयार होईना. अखेर ससून रुग्णालयाच्या शवागाराचे दरवाजे रात्री बारा वाजता ठोठावले. तेथील कर्मचाऱ्यांना हाका मारल्या. मात्र, काही केल्या दरवाजा उघडला नाही. एक तास प्रयत्न करून रुग्णवाहिका घराकडे वळवली. पूर्ण रात्र मृतदेह रुग्णवाहिकेत ठेवला आणि दुसऱ्या दिवशी नातेबाइकाचा अंत्यविधी केल्याचे सांगताना रवींद्र गायकवाड यांचे अश्रु अनावर झाले.