पुणेः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अलीकडेच केलेल्या एका वक्तव्यामुळं ते चर्चेत आले आहेत. पाकिस्तानातील सामान्य नागरिक भारताचे शत्रू नसल्याचं वक्तव्य शरद पवार यांनी केलं आहे. पुण्यातील कोंढवा परिसरात ईद मिलन कार्यक्रमात ते बोलत होते.

‘सध्या जगात एक वेगळी परिस्थिती निर्माण झाली आहे. रशियासारखा शक्तीशाली देश युक्रेनसारख्या लहान देशावर आक्रमण करत आहे. श्रीलंकेतील तरुण रस्त्यावर उतरुन लढत आहे आणि तेथील नेते भूमिगत झालेत. शेजारी पाकिस्तानमध्ये आपले बांधव राहतात. तेथे एक तरुण पंतप्रधान झाला. त्याने देशाला दिशा देण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला सत्तेतून बाहेर काढण्यात आलं,’ असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

अधिक वाचा  दख्खनच्या राजाला 1 टनाची महाघंटा अर्पण, जोतिबाच्या भक्तासाठी अनोखा अनुभव

‘पाकिस्तानसारखा देश ज्या देशात तुमचे आमचे बांधव आहेत. पाकिस्तानचे जे राज्यकर्ते आहेत त्यांच्या भूमिकेमुळं ही परिस्थिती पाहायला मिळतेय, असं माझं स्पष्ट मत आहे. मी अनेकदा पाकिस्तानात गेलो. या देशाचा मंत्री म्हणून गेलो. तर बीसीसीआयचा अध्यक्ष म्हणून गेलो. आपल्याला आश्चर्य वाटेल कुठेही दुस्वास नाही. जाईल तिथे स्वागत करण्यात आलं. त्या ठिकाणाचा सामान्य माणूस आपला विरोधक नाहीये. ज्यांना पाकिस्तानच्या सैन्याचा वापर करून सत्ता काबिज करायची आहे आणि त्यासाठी जे राजकारण करतात तेच दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करतात,’ असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. तसंच, पाकिस्तानमध्ये ज्यांना पाकिस्तानी सैन्याची मदत घेऊन सत्ता काबिज करायची आहे त्यांनाच दोन्ही देशांमध्ये तणाव हवा असतो, असंही त्यांनी नमूद केलं.