पुणे – रेल्वे स्थानकात शुक्रवारी सकाळी बॉम्बसदृश संशयास्पद वस्तू सापडल्याने खळबळ उडाली होती. बॉम्ब शोधक पथकाने तपास केल्यानंतर त्या फटाक्‍याच्या फुसक्‍या नळ्या असल्याचे समोर आले.

परंतु, त्या नळ्या जिलेटिन कांड्याप्रमाणे आहेत. याच प्रकारच्या 56 जिलेटिन कांड्या तीन दिवसांपूर्वी (दि.10) नागपूर मध्यवर्ती रेल्वे स्थानकावर संध्याकाळच्या सुमारास एका बॅगेत आढळल्या होत्या. जिवंत बॉम्बप्रमाणे त्याची रचना करण्यात आलेली होती. बॉम्ब नाशक पथकाने त्या नळ्या ताब्यात घेत निष्क्रिय केल्या होत्या. या दोन्ही प्रकारामध्ये सापडलेल्या नळ्या जिलेटिन कांड्याप्रमाणे असल्याने तसेच पुणे आणि नागपूर ही दोन्ही स्थानके “जंक्‍शन’ असल्याकारणाने यामधील गूढ वाढले आहे. नागपूर रेल्वे स्थानकानंतर तीनच दिवसांत पुणे रेल्वे स्थानकावर एक सारखीच घटना घडल्याने याचा पुढील तपास पोलिसांना गांभीर्याने करावा लागणार आहे.

अधिक वाचा  पुणे शहरातील पुराचा धोका असणारी २३ ठिकाणे

पुणे रेल्वे स्थानकावर तीन ते चार फुसक्‍या नळ्या सापडलेल्या असल्या तरी त्याची रचनाही जिलेटीनच्या कांड्या प्रमाणे आहे. तसेच, त्या प्लॅटफॉर्मलगत ठेवलेल्या स्थितीत आढळून आल्या तशाच प्रकारे नागपूर रेल्वेस्थानकाच्या मुख्यदाराच्या बाजूला असलेल्या पोलीस बूथजवळ एका बॅगमध्ये 56 जिलेटिनच्या काड्या त्याही एका सर्किटमध्ये जोडलेल्या आढळून आल्या होत्या. या दोन्ही घटना वेगळ्या असल्या तरी यामध्ये जिलेटीन कांड्याप्रमाणे असलेल्या नळ्या हे साम्य दिसून येत आहे. त्यामुळे हा प्रकार कोण करीत आहे, यामागे घातपाताचा काही प्रयत्न आहे का? याबाबी शोधण्याचे पोलिसांपुढे आव्हान असणार आहे. दरम्यान, पुणे आणि नागपूर मध्ये सापडलेल्या बॉम्बसदृश्‍य नळ्या बॉम्ब नाशक पथकानं घटनास्थळापासून दूर नेऊन निष्क्रिय केल्या असल्या,9 तरी या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन या बॉम्बसदृश वस्तू या दोन्ही रेल्वे स्थानकांत कोणी आणल्या? त्या ठेवण्यामागे काय उद्देश आहे, याचा तपास पुणे आणि नागपूर पोलिसांना करावा लागणार आहे.