पुणे : भारत देश हा अनेक जाती धर्मांनी बनलाआहे. यामध्ये अनेक विविधता असून ती उठून दिसायला हवी. या देशात जी फुलं उमलली आहेत त्यांचा सन्मान करायला पाहिजे. आज जगात चमत्कारी स्थिती निर्माण झाली आहे. रशिया छोट्याश्या युक्रेनवर हल्ला करतोय. त्यात हजारो लोकं मारली जात आहेत. यातून मानवतेचं दर्शन संपल्याच चित्र दिसतं आहे.

तर आपल्या शेजारच्या श्रीलंकेत सामान्य नागरिक हे रस्त्यावर उतरले असून संघर्ष सुरू आहे. राज्यकर्ते भूमिगत झाले आहेत. पाकिस्तानमध्ये पंतप्रधानाला पद सोडावं लागलं. हे का घडतंय? कारण त्या ठिकाणचे राज्यकर्ते आणि त्यांनी घेतलेल्या भूमिका जबाबदार आहेत, असे मत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे. ते पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित सर्वपक्षीय ‘ईद मिलन’ चा कार्यक्रमात बोलत होते. यावेळी खासदार अमोल कोल्हे, वंदना चव्हाण यासह आमदार आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

अधिक वाचा  उध्वस्त केलेल्या मंदिराविषयी आता बोलून काहीही उपयोग नाही, ज्ञानवापी मशिदीच्या वादासंदर्भात सद्गुरूंचे भाष्य

पवार म्हणाले की, आज देशाच्या अभिमानाला धक्का लावण्याचा प्रयत्न केला जात असून पिढ्यानपिढ्या एकत्र राहणाऱ्यांना तोडण्याचा प्रयत्न केला जातोय. आपल्या सगळ्यांना एकत्र येऊन अश्याच्या विरोधात उभं रहावं लागणार आणि धडा शिकवावा लागणार आहे. आज आपण इथे जमलो आहोत त्याचे कारण आपल्याला जात धर्म बाजूला ठेवायचा आहे. आपल्याला माणुसकी जपायची आहे. महागाई, विकासाचे प्रश्न उभे आहेत. मात्र देशात जे चित्र उभे झाले त्या अनुषंगाने आपल्याला सध्या भाईचारा आवश्यक आहे. आज चुकीचे विचार देशात पसरवले जात असून राजकारणासाठी वातावरण दुषित केलं जात आहे हे चांगलं नाही. त्याविरोधात आपण उभं राहिलं पाहिजे, असे पवारांनी आवाहन केले.

अधिक वाचा  समाविष्ट गावांना मिळकतकर सवलत नाहीच; विधी चा अभिप्राय घेऊन निर्णय - आयुक्त

दरम्यान, मी अनेकदा पाकिस्तानमध्ये गेलो आहे. लाहोर, कराची मध्ये गेलो तिथे दुतावास नाही यामुळे कराचीत मी एका हॉटेल मध्ये गेलो होतो. तेव्हा तेथे माझ्याकडून पैसे घेतले नाही. कारण तुम्ही आमचे पाहुणे आहात, असे त्यांनी सांगितले. सचिनचा आम्ही खेळ पाहतो, असेही त्यांनी सांगितले. सचिनचे कौतुक केले. असा अनुभव मी घेतल्याचे त्यांनी सांगितले. पवार म्हणाले, पाकिस्तानातील सामान्य माणूस आपला विरोधक नाही. आपल्या भारत देशात जात धर्म याचा कधी विचार नव्हता. मात्र तो आता पसरवला जात आहे. अशा लोकांना धडा शिकवण्यासाठी सगळ्यांनी एकत्र यायला पाहिजे, असे पवारांनी स्पष्ट केले.