मुंबई :राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एका जाहीर कार्यक्रमात सादर केलेल्या कवितेवरून सध्या राजकीय गदारोळ सुरू आहे. पवार यांनी हिंदू देवी-देवतांचा अवमान केल्याचा आरोप करत भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. तर दुसरीकडे, भाजपने अर्धवट व्हिडिओ शेअर करून दिशाभूल केल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर एका तरुणाने सोशल मीडियावर आक्षेपार्ह शब्दांत ट्वीट केलं असून यावरून राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी संताप व्यक्त केला आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर तरुणाची वादग्रस्त पोस्ट शेअर करत मुंबई पोलिसांकडे सदर तरुणावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. ‘काय पातळीवर हे सगळे होत आहे? या विकृत इसमाविरुद्ध कडक कारवाई करा,’ असं ट्वीट आव्हाड यांनी केलं आहे.

अधिक वाचा  अभिमानास्पद! अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित

तरुणाच्या वादग्रस्त पोस्टमध्ये काय लिहिलं आहे?

‘बागलाणकर’ नावाच्या ट्विटर हँडलवर आक्षेपार्ह मजकूर वापरत एक पोस्ट लिहिण्यात आली आहे. ‘वेळ आली आहे बारामतीच्या गांधीसाठी बारामतीचा नथुराम गोडसे तयार करण्याची…’ असं या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.