मुंबई : भाजप नेते आणि राज्याचे विधान परिषदचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना मुंबई बँकेच्या बोगस मजूर प्रकरणात आज अटक करण्यात आली. पोलिसांनी आज शुक्रवारी (ता. 13) त्यांना हजर राहण्यासाठी नोटीस बजावली होती. मात्र अटक केल्यानंतर दरेकर यांना तात्काळ जामीन देखील मिळणार आहे. उच्च न्यायालयाने दरेकर यांना दिलासा देत या गुन्ह्यात अटक झाल्यास तात्काळ सुटका करण्याचे आदेश देत नुकताच अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.

मुंबै बँकेच्या निवडणुकीत मजूर वर्गातून निवडणूक लढविल्यामुळे प्रविण दरेकर अडचणीत आले आहेत. या प्रकरणात मुंबई पोलिसांकडून दरेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बँकेच्या निवडणुकीत दरेकर यांनी मजूर प्रवर्गातून अर्ज भरला होता. याला आक्षेप घेत तक्रार दाखल करण्यात आली होती. सहकार विभागाने याची चौकशी करुन दरेकर यांना अपात्र ठरवत मजूर म्हणून त्यांचे सदस्यत्व रद्द केले आहे.

अधिक वाचा  ओवेसी याच्या प्रतिमेवर थुंकून पतित पावन तर्फे निषेध आंदोलन

या गुन्ह्या प्रकरणी दरेकर यांनी अटकपूर्व जामीनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयाने ३५ हजारांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर आणि दोन जामीनदारांची हमी देण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार शुक्रवारी माता रमाबाई आंबेडकर पोलिस ठाण्यात बोलावण्यात आले आहे. त्यानुसार दरेकर यांना पोलिस अटक दाखवून जामीन देणार असल्याची माहिती आहे.

दरम्यान, कामगार असल्याचा दावा करून दरेकर हे १९९९ मध्ये कामगार सहकारी संस्थेचे सदस्य झाले. त्यांनी २०१६ मध्ये विधान परिषद निवडणुकीपूर्वी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्याकडे २.३ कोटी रुपयांची मालमत्ता होती. त्यांच्याकडे २.५ लाख रुपयांच्या मासिक उत्पन्नासह ९१ लाख रुपयांची रोकड होती. यावरून ते मजूर नसल्याचे दिसून येते, असेही सरकारी वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.