आदिनाथ कोठारे अन् उर्मिला कानेटकर-कोठारे या दोघांमध्ये काही तरी बिनसलंय याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. उर्मिला ‘कोठारे’ कुटुंबातून बाहेर पडली आहे,म्हणजे ती आता आदिनाथसोबत राहत नाही अशीही बातमी सूत्रांकडून कळाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार,उर्मिला ‘कोठारे’ कुटुंबाचं घर ज्या इमारतीत आहे त्याच इमारतीतील एका दुसऱ्या फ्लॅटमध्ये शिफ्ट झाली आहे. आदिनाथ-उर्मिलाची चार वर्षांची मुलगी जीजा हिला सध्या तिचे आजी-आजोबा म्हणेज आदिनाथ-उर्मिलाचे आई-बाबा चौघे मिळून सांभाळत आहेत.

आदिनाथ-उर्मिला मध्ये गेल्या दीड-दोन वर्षापासून धुसफूस सुरू आहे. त्यांच्यात सारं पूर्वीसारखं सुरळीत सुरू व्हावं यासाठी त्यांचे कुटुंबिय सध्या प्रयत्न करत असल्याचं देखील कळत आहे. उर्मिला सध्या तिच्या ‘तुझेच गीत गात आहे’ या मालिकेच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. १२ वर्षांनी छोट्या पडदयावर कमबॅक करताना तिनं ‘कोठारे’ व्हिजन या आपल्या होम प्रॉडक्शनची नाही तर दुसऱ्या प्रॉडक्शनची निवड केली. त्यामुळे तर त्या दोघांमध्ये नक्कीच काहीतरी बिनसलंय या बातमीनं जोर धरला. पण आता यातच आदिनाथनं या प्रकरणावर मौन सोडत स्पष्टिकरण दिल्याचं कळत आहे.

अधिक वाचा  देहू नगरीत पंतप्रधान येणार; शिळा मंदिराचं लोकार्पण

एका मराठी वृत्तवाहिनीशी याबाबत बोलताना आदिनाथ कोठारे म्हणाला आहे,”उर्मिला आणि माझ्यात सगळं छान सुरु आहे. आम्ही एकमेकांसोबत खूश आहोत. आमच्या नात्याबाबत सगळ्या चुकीच्या बातम्या पसरल्या आहेत. फक्त सध्या आम्ही शूटिंगमध्ये बिझी असल्यानं एकमेकांसोबत दिसत नाही एवढंच. उर्मिला आणि मी दोघंही या अशा अफवा पसरवणाऱ्या बातम्यांना महत्त्व देत नाही”. आदिनाथनं स्पष्टिकरण देऊन तात्पुरता विषय संपवला असला तरी उर्मिलानं प्रसारमाध्यमांपासून लांब राहणं पसंत केल्यानं अजूनही या विषयावर पडदा तसा पडलेला नाही. उर्मिला मीडियाचे फोन घेणंही टाळत आहे हे प्रकर्षानं दिसून आलेलं आहे. पण असो,आदिनाथ कोठारे जे बोलत आहे ते जर खरं असेल तर त्या दोघांच्या चाहत्यांसाठी ही ‘गूडन्यूज’ म्हणायची.