पुणे –सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे नवीन कुलगुरूपदाच्या निवडीची प्रक्रिया विद्यापीठ कायद्यातील नव्या सुधारणा विधेयकानुसार होईल. नव्या विद्यापीठ कायद्याच्या सुधारणा विधेयकास राज्यपालांनी मंजुरी दिल्यानंतर नवीन कुलगुरूपदाची निवड प्रक्रिया सुरू होईल.तोपर्यंत प्रभारी कुलगुरूंकडे विद्यापीठाचा कार्यभार सोपविण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.

पुणे विद्यापीठाच्या पदवीप्रदान कार्यक्रमानंतर उदय सामंत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांचा कार्यकाळ येत्या 17 मे रोजी संपत आहे. नव्या कुलगुरू निवडी संदर्भात सामंत म्हणाले की, राज्याच्या विधिमंडळात नव्या विद्यापीठ कायद्याचे सुधारणा विधायक एकमताने मंजूर झाले आहे. आता निर्णय राज्यपालांनी घ्यायचा आहे. राज्यपालांच्या स्वाक्षरीशिवाय हे विधेयक पास होणार नाही. नव्या कायद्यात जे बदल करण्यात आले आहेत, त्यामध्ये कुलपतींच्या अधिकारावर गदा आलेली नाही. विधानसभा आणि विधानपरिषदेत हे विधेयक मंजूर झाले आहे.

अधिक वाचा  भाजपा मोठा चमत्कारीक पक्ष, कशाचा इव्हेंट करतील याच भरवसा नाही

राज्य सरकारने नवीन विधेयक आणले असेल तर जुन्या पद्धतीने निवड का करायची? तोपर्यंत प्रभारी कुलगुरूंकडे विद्यापीठाचा कार्यभार सोपविण्यात येणार आहे. सीईटी परीक्षेसंदर्भात सामंत म्हणाले की, देशभरात जेईई, नीट परीक्षा आणि राज्यातील सीईटी परीक्षा जवळपास एकाच कालावधीत होणार असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेसोबत चर्चा करून सीईटी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या तयारीवर परिणाम होऊ नये म्हणून हा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने प्राध्यापक भरतीसाठीच्या सर्व प्रक्रिया पूर्ण केल्या आहेत. सरकारच्या बाजूने विषय उरलेला नाही. आता, विद्यापीठांनी बिंदुनामावली शासनाकडे सादर करावी. त्यामुळे तातडीने भरतीप्रक्रिया राबविता येईल.

अधिक वाचा  महापालिकेचा कार्यकाळ संपला तरी स्थायी समितीचे अस्तित्व कायम राहते, न्यायालयात याचिका दाखल

प्रभारी कुलगुरू पदाचा कार्यभार डॉ. काळे यांच्याकडे…
विद्यमान कुलगुरू डॉ. नितीन करमळकर पाच दिवसांनी सेवानिवृत्त होत आहेत. त्यानंतर प्रभारी कुलगुरू पदाचा कार्यभार लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. कारभारी काळे यांच्याकडे दिला जाणार असल्याची चर्चा कानावर आल्याचे उदय सामंत यांनी बोलून दाखविली. त्यामुळे पुणे विद्यापीठाचे प्रभारी कुुलगुरूपदी डॉ. काळे यांची नियुक्‍ती होणार शक्‍यता आहे.