पुणे: घरची आर्थिक स्थिती बिकट असल्याने सारिका सुतार (वय ३८) या महिलेने तिची किडनी देण्याचा निर्णय घेतला.तिला कर्जाची परतफेड करायची होती, त्यामुळे स्वत:ची किडनी अमित साळुंखे यांना देण्याचे तिने कबूल केले. त्यासाठी अमित साळुंखे आणि त्याची पत्नी सुजाता यांनी सुतार यांना १५ लाख रुपये देऊ असे आश्वासन दिले. सुतार यांची किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया २४ मार्च रोजी रुबी हॉल क्लिनिकमध्ये झाली. मात्र, महिलेला ठरल्याप्रमाणे पैसे न मिळाल्याने तिने कोरेगाव पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली होती आणि हा किडनी तस्करीचा प्रकार उघड झाला.

अधिक वाचा  राणा दाम्पत्याला झटका, BMC ची नोटीस,अनधिकृत बांधकाम केल्याचा आरोप

किडनी तस्करी प्रकरण समोर आल्यानंतर रुबी हॉल क्लिनिकला नोटीस बजावण्यात आली होती. या प्रकरणाच्या चौकशीसाठी आरोग्य विभागाने चार सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली. वैद्यकीय शिक्षण विभागाने ससून रुग्णालयातील प्रत्यारोपण समितीची चौकशी केली. चौकशीअंती ससूनमधील अवयव प्रत्यारोपण समितीला स्थगिती देण्यात आली. ‘रुबी हॉल क्लिनिक’च्या अवयव प्रत्यारोपण केंद्राचा परवानाही निलंबित करण्यात आला. रुग्णालयाने कागदपत्रांची तपासणी काळजीपूर्वक न केल्याचे अहवालात नमूद करण्यात आले.

किडनी तस्करी प्रकरणात राज्याच्या आरोग्य विभागाच्या चौकशी समितीने किडनी प्रत्यारोपणातील रुग्ण, त्यांचे नातेवाईक आणि संबंधित रुग्णालयातील प्रत्यारोपण विभागाचे प्रमुख डॉक्टर यांची २० एप्रिल रोजी दिवसभर ‘इन कॅमेरा’ कसून चौकशी केली. या चौकशीला आरोग्य खात्यातील अधिकारी देखील उपस्थित होते. याप्रकरणी मानवी अवयव प्रत्यारोपण कायदानुसार कारवाई करण्यात आली. कागदपत्रे काळजीपूर्वक न तपासल्याच्या कारणावरून रुबी हॉलमधील डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक वाचा  राज्यसभेची सहावी जागा चुरशीची : काँग्रेस-राष्ट्रवादीतील आयात नेत्यांना भाजपकडून संधी?

किडनी प्रत्यारोपण प्रक्रिया रुबी हॉल क्लिनिक येथे पार पडली. डोनर आणि रिसिव्हर यांच्या कागदपत्रांची तपासणी रुग्णालयाने व्यवस्थित करणे अपेक्षित होते. ती कागदपत्रे रिजनल ऑथाॅरिटी कमिटीकडे सुपूर्त करायची असतात. रुग्णालयाने कागदपत्रांची शहानिशा न करता ती समितीकडे पाठविताना निष्काळजीपणा केला आणि समितीची दिशाभूल केली. त्यामुळे मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा १९९४ मधील कलम १० चे उल्लंघन केले आहे. त्यामुळे रुग्णालयातील संबंधित डॉक्टर, किडनी देणारी महिला, किडनी प्रत्यारोपण झालेली व्यक्ती, त्याची पत्नी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.