आयफोन बनविणारी जगप्रसिद्ध कंपनी अ‍ॅपल आता जगातील सर्वात श्रीमंत कंपनी राहिलेली नाही. सौदीच्या ‘राजाने’ अ‍ॅपलचा हा मुकुट हिसकावला असून जगातील सर्वात मोठी कंपनी बनली आहे. सौदी अरामकोने अ‍ॅपल कडून हा नंबर खेचून आणला आहे. सौदी अरबची ही कंपनी असून जगातील सर्वात मोठी तेल उत्पादन करणारी ही कंपनी आहे. युक्रेन युद्धामुळे तेलाच्या किंमतीत वाढ झाल्याचा फायदा आणि टेक कंपन्यांच्या शेअर्सची घसरलेली मागणी याचा थेट फायदा सौदीच्या या कंपनीला झाला आहे. बुधवारी बंद झालेल्या बाजारामुल्यानुसार सौदी अरामकोचे बाजारमुल्य 2.42 लाख कोटी डॉलर होते तर अ‍ॅपलचे बाजारमुल्य 2.37 लाख कोटी डॉलर होते.

अधिक वाचा  राज ठाकरेंची तोफ धडाडणार; पुण्यात अखेर रविवारी सभा निश्चित

या वर्षाच्या सुरुवातीला अ‍ॅपलचे बाजारमुल्य तीन लाख कोटी डॉलरवर गेली होती. अरामको तेव्हा एक लाख कोटी डॉलर मागे होती. या चार महिन्यांच्या काळात अॅपलच्या शेअरमध्ये २० टक्के घसरण झाली आणि अरामकोच्या शेअरमध्ये २८ टक्क्यांची वाढ झाली. असे असले तरी अ‍ॅपल अमेरिकेत एक नंबरलाच आहे. तर मायक्रोसॉफ्ट १.९५ लाख कोटी डॉलर बाजारमुल्यासह दुसऱ्या क्रमांकावर आहे.

अ‍ॅपलचे पहिल्या तिमाहीत प्रदर्शन चांगले असले तरी दुसऱ्या तिमाहीत चीनमध्ये कोरोनामुळे लॉकडाऊन लागल्याने आणि पुरवठ्यावर परिणाम झाल्याने त्याचा फटका बसणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. दुसरीकडे सौदी अरामकोचा निव्वळ नफा हा गेल्यावर्षी १२४ टक्क्यांनी वाढला आहे. २०२० मध्ये हा नफा ४९ अब्ज डॉलर एवढा होता. २०२१ मध्ये ११० अब्ज डॉलर नफा झाला होता. तेलाच्या किंमती वाढल्या असल्या तरी महागाई वाढल्याने कच्च्या तेलाची मागणी घसरण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तसेच पुरवठ्यावर परिणाम झाल्याने टेक कंपन्यांच्या शेअरवरही दबाव असणार आहे.