श्रीलंकेचे नवे पंतप्रधानपद म्हणून रनिल विक्रमसिंघे यांनी आज शपथ घेतली आहे. विक्रमसिंघे हे श्रीलंकेच्या राजकारणातील महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व मानले जातात. त्यांचा पक्ष युनायटेड नॅशनल पार्टीला गेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यांच्या पक्षाला निवडणुकीतून एकही जागा मिळाली नव्हती. पण त्यांच्या पक्षाला श्रीलंकेच्या संसदीय प्रणालीप्रमाणे राष्ट्रीय यादीनुसार एक जागा मिळाली होती. या राखीव जागेमुळेच रनिल विक्रमसिंघे खासदार बनले आणि आता ते श्रीलंकेचे पंतप्रधान बनले आहेत. श्रीलंकेत गेल्या काही दिवसांपासून राजकीय अस्थैर्य आणि आर्थिक अडचणी पाहायला मिळत आहे.
राष्ट्राध्यक्ष गोटाबाया यांनी केली होती घोषणा
श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष गोटाबाया राजपक्षे यांनी नव्या सरकारसंदर्भात एक महत्त्वाची घोषणा केली होती त्यानुसार रनिल यांनी आज पंतप्रधानपदाची शपथ घेतली. त्यांनी ट्वीट करून सांगितलं होतं, देशात अराजकतेची स्थिती नियंत्रित करण्यासाठी आणि इतर समस्या सोडवण्यासाठी नवीन पावलं उचलले जातील. त्यांनी सांगितलं होतं की एका आठवड्याच्या आत संसदेत बहुमत असलेल्या आणि लोकांचा विश्वास संपादन करण्याची क्षमता असलेल्या पंतप्रधानांची नियुक्ती केली जाईल. त्यांनी म्हटलं आहे, नव्या सरकारला त्यांचे उपक्रम राबवायची संधी दिली जाईल. देश पुढे जावा यासाठी जे धोरणं आखली जातील त्याला आम्ही पाठिंबा देऊ. त्याशिवाय संसदेला अधिक सशक्त करण्यासाठी घटनेत आणखी सुधारणा करण्यात येईल. त्याबरोबरच कार्यकारी अध्यक्ष हे पद समाप्त करण्याचाही प्रस्ताव आहे.
गोटाबाया त्यांच्या शेवटच्या ट्विटमध्ये लिहितात, “लोकांच्या आयुष्य आणि त्यांच्या संपत्तीच्या रक्षणासाठी मी लोकांना मदतीसाठी नम्र आवाहन करत आहेत”
श्रीलंका सध्या एका मोठ्या आर्थिक संकटाला तोंड देत आहे. त्याविरोधात तिथली जनता निदर्शनं करत आहे. देशभरात झालेल्या हिंसाचारामुळे गोळीबार झाला आणि त्यात पाच लोकांचा मृत्यू झाला आहे. आर्थिक संकटाशी झुंज देणाऱ्या महिंदा राजपक्षे यांचा राजीनामा अचानक आलेला नाही. त्याचा कयास आधीपासून लावला जात होता. महिंदा राजपक्षे यांना राजीनामा द्यायला गोटाबाया यांनीच सांगितलं होतं.