नवी दिल्ली : महाराष्ट्रातील राज्यसभेचे शिवसेना खासदार संजय राऊत, भाजपचे राज्यसभा खासदार पियूष गोयल, विकास महात्मे, विनय सहस्त्रबुद्धे, राष्ट्रवादीचे प्रफुल पटेल आणि काँग्रेसचे पी.चिदंबरम यांच्या ६जागांसह राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या ५७ जागांसाठीचा द्वीवार्षिक निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. येत्या १० जून रोजी राज्यसभेच्या ५७ जागांसाठी निवडणूक होणार आहे. उत्तर प्रदेशमधून सर्वाधिक ११, महाराष्ट्र आणि तामिळनाडूमधून प्रत्येकी ६, बिहारमधून ५ आणि राजस्थान आणि कर्नाटकमधून ४-४ जागांवर निवडणूक होणार आहे. २४ मे रोजी ५७ जागांसाठी निवडणुकीची अधिसूचना जारी करण्यात येणार असल्याचे निवडणूक आयोगाने सांगितले आहे.

अधिक वाचा  मान्यता नसलेल्या शाळांवर होणार कारवाई, पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक यांचा इशारा

येत्या तीन महिन्यांत रिक्त होणाऱ्या जागांसाठाचा देखील निवडणुकीचा कार्यक्रम आज जाहीर करण्यात आला. राज्यसभेतून निवृत्त होणाऱ्या सदस्यांमध्ये केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी, पीयूष गोयल, निर्मला सीतारामन, काँग्रेसच्या अंबिका सोनी, जेडीयूचे केसी त्यागी अशा दिग्गज नेत्यांचा समावेश आहे. आज (गुरुवारी) राज्यसभेत या सदस्यांच्या निरोपाचा औपचारिक सोहळा पार पडणार होता. मात्र भाजपचे राज्यसभेचे खासदार प्रवीण राष्ट्रपाल यांच्या निधनाचे वृत्त राज्यसभेत येताच राज्यसभेने दिवंगत सदस्याला श्रद्धांजली अर्पण करून सभा तहकूब केली.

राज्यसभेच्या ५७ जागा या १५ राज्यांमधील आहेत. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, तेलंगाणा, छत्तीसगड, पंजाब, मध्यप्रदेश, कर्नाटक, ओडिशा, राजस्थान, उत्तराखंड, बिहार , झारखंड आणि हरियाणा राज्यांतील जागांचा त्यामध्ये समावेश आहे.

अधिक वाचा  राज ठाकरेंना पुण्यातील सभेआधी शिवसेने कडून मोठा धक्का!

राज्यसभेत एकूण संख्याबळ २३८ आणि राष्ट्रपती नियुक्त १२ अशा २५० जागा असतात. सध्या राज्यसभेच्या २४५ जागा आहेत. महाराष्ट्रातून राज्यसभेवर १९ जागा निवडून दिल्या जातात.

महाराष्ट्रातील ६ खासदारांचा कार्यकाळ संपणार आहे. महाराष्ट्रातील संजय राऊत, विकास महात्मे, पियूष गोयल, विनय सहस्त्रबुद्धे, प्रफुल पटेल आणि पी चिदंबरम यांचा कार्यकाळ संपला आहे. राष्ट्रपती नियुक्त खासदार म्हणून कार्यकाळ संपलेल्या संभाजीराजे छत्रपती यांनी आज राज्यसभेची निवडणूक लढवणार असल्याचं म्हटलं आहे. तर, सध्याच्या महाराष्ट्रातील विधानसभेच्या संख्याबळानुसार भाजपचे २ राष्ट्रवादी काँग्रेसचा १, शिवसेनेचा १ आणि काँग्रेसचा १ खासदार निवडून येऊ शकतो. सहाव्या जागेवर संभाजीराजे छत्रपती यांनी दावेदारी सांगितली आहे. त्यामुळं निवडणुकीत कुणाचा पत्ता कट होणार हे पाहावं लागणार आहे.