मुंबई : सर्व कलाकार हे आजकाल सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. ते सतत त्यांचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून सामाजिक विषयांवर बिनधास्तपणे मत मांडताना दिसतात. या यादीमधील एक अभिनेत्री म्हणजे हेमांगी कवी. नुकताच हेमांगीने धर्मवीर आनंद दिघे यांच्याशी संबंधीत केलेल्या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

हेमांगीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर ‘धर्मवीर’ या चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. हे पोस्टर शेअर करत तिने, “दादर हुन येताना माहीमच्या सिग्नलवरून वेस्टन एक्सप्रेस हायवेसाठी राइट मारला आणि डावीकडे हे डोळे दिपवणारं एका मराठी चित्रपटाचं भलं मोठ्ठं पोस्टर पाहिलं आणि खरं सांगू अंगात एक चेतना निर्माण झाली. पहिल्यांदा जेव्हा सोशल मीडियावर या चित्रपटाबद्दल कळलं तेव्हा वाटलं आता काय, आणखी एक बायोपिक? तेव्हा हा चित्रपट कुणावर आहे काहीच माहीत नव्हतं. मग काही दिवसांनी एक टीझर प्रदर्शित झाला आणि साला काळजात धस्स झालं (चांगल्या अर्थाने)” असे कॅप्शन दिले.

पुढे प्रसाद ओकच्या धर्मवीर चित्रपटातील लूक विषयी ती म्हणाली, “स्लो मोशनमध्ये चालत आलेला एक चेहरा पाहिला! आणि मनात आलं… कसं? हे कसं शक्य आहे. ते परत आले की काय!!! मला अक्षरशः काही मिनिटं लागली भानावर यायला! इतकं साम्य? हॅट्स ऑफ त्या मेकअप आर्टीस्ट आणि लूक डिझायनरला. बरं जो कलाकार या महान व्यक्तीची भूमिका साकारणार आहे त्याबद्दल तर जितकं बोलू तितकं कमी पडेल! तुम्ही मेकअप, कपडे आणि केस करून सेम टू सेम दिसायचा प्रयत्न कराल… यशस्वी व्हाल… अरे पण त्या ‘भेदक’ नजरेचं काय कराल? ते कुठून आणलंस, कसं जमवलंस मित्रा प्रसाद ओक? बाप रे! तू बाप आहेस! आणि ज्यांच्यावर हा बायोपिक आहे ते आमच्या ठाणे जिल्ह्याचे वाघ ‘आनंद दिघे साहेब.’ फार कमी लोकं आहेत ज्यांना आतून, मनातून ‘साहेब’ म्हणावसं वाटतं!”

अधिक वाचा  पुण्यात मोटारीत बेकायदा गर्भलिंग निदान केंद्र;तिघांविरोधात गुन्हा दाखल,मोटार आणि यंत्रणाही जप्त

दरम्यान, हेमांगी आनंद दिघे यांच्या आठवणीत भावूक झाली आहे. तिने पोस्टमध्ये त्यांच्याविषयी अनेक गोष्टी सांगितल्या आहे. “कळव्याच्या मार्केट एरियामध्ये २ बिल्डिंगच्या निमुळत्या बोळात टेंभी नाक्यावरच्या जगप्रसिद्ध भवानी मातेची मूर्ती घडवली जायची, अजून ही घडतेय! मूर्तिकार पुंडलिक शिळकर यांच्या हस्ते! त्या २ बिल्डिंगपैकी एकामध्ये मी राहायचे. गणपती विसर्जन झाल्यावर तिसऱ्या दिवशी ज्या पाटावर देवीची मूर्ती घडवणार त्याची पूजा केली जायची. घटस्थापनेच्या दिवशी कळवा ते टेंभी नाका या देवीची ज्या पद्धतीने मिरवणूक निघायची ना ती जगात कुठे कुणी पाहिली नसेल! इतकी भव्य आणि राजेशाही. ‘अबब’ गर्दी कश्याला म्हणतात हे मला तेव्हा कळलं आणि त्या गर्दीतून दू. 12 1 च्या सुमारास आवाज यायला सुरुवात व्हायची… ‘दिघे साहेब आले दिघे साहेब आले.’ मला जसं समजतंय तेव्हापासून मी ही मिरवणूक पाहत आलीये, हे नाव ऐकत आलेय आणि हा भेदक नजरेचा प्रसन्न चेहेरा पाहत आलेय. दिघे साहेबांची अंगकाठी फारच लहान होती पण त्याचं वलय १०० आडदांड माणसांचं ही कमी पडेल इतकं भारी आणि जादू करणारं होतं! आपल्या डोळ्यात न सामावणारं आणि ही अजिबात अतिशयोक्ती नाही.”

अधिक वाचा  भाजपने राजकारणाचा स्तर घालवला, "आता किमान..."; रोहीत पवारांची भाजपवर टीका

“माझ्या वाढत्या वयात माझी सुरक्षितता महत्वाची होती आणि त्याचं रक्षण करणारी व्यक्ती तितकीच महत्वाची आणि जवळची आहे मला. दिघे साहेब गेले असं ज्या दिवशी सांगण्यात आलं तो रविवार होता आणि त्यादिवशी माझा वाढदिवस होता! २६ ऑगस्ट! मी कॉलेजच्या चौथ्या वर्षाला होते. अख्खं ठाणं जळत होतं. कुणालाच मान्य नव्हतं त्यांचं जाणं! कळव्यात किती तरी दिवस जीव घेणारी शांतता पसरली होती. २००१ चा घटस्थापनेचा दिवस मला अजून आठवतोय…त्यावर्षीची ती मिरवणूक इतकी भकास आणि मनाला चटका लावून जाणारी होती काय सांगू… त्यानंतरच्या कित्येक वर्षांच्या मिरवणुका फिक्याच गेल्या. ‘जय भवानी जय शिवाजी’ अश्या मोठ्या आवाजात घोषणा देणाऱ्या दिघे साहेबांचे दरवर्षी न चुकता होणारे दर्शन आता यापुढे कधीच होणार नाही या fact मुळे आम्ही सगळे ढसा ढसा रडत होतो! तुम्हांला खोटं वाटेल पण त्यावर्षी दगडाच्या मूर्तीच्या डोळ्यात ही पाजर फुटलेला मी पाहिलाय! मी देव भोळी नाही. अश्या गोष्टींना माझा मुळीच पाठिंबा नाही…पण जे माझ्या डोळ्यांनी पाहिलं तेच प्रामाणिकपणे सांगतेय. मी आजपर्यंत प्रत्यक्षात कधीच जंगलातला वाघ पहिला नाहीए पण मी मुंबई आणि ठाणे या माणसांच्या जंगलातले २ खरे वाघ पाहिलेत…एक मा. श्री. बाळासाहेब ठाकरे आणि दुसरे मा. श्री आनंद दिघे साहेब!” असं पुढे ती म्हणाली.

अधिक वाचा  मुख्यमंत्र्यांच्या अजब अटी; राजेंनी डोकेच खाजवले! अटी सुधारणेचा प्रस्ताव