मुंबई : मनसे प्रमुख राज ठाकरे यांना धमकीचं पत्र आल्यानंतर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेत निवेदन दिलं. त्यानंतर नांदगावकरांनी माध्यमांशी बोलताना राज ठाकरेंच्या केसाला धक्का लागला तरी महाराष्ट्र पेटेल, असा इशारा दिला. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिलीय. ता“अशी पत्रे शिवसेना भवनात आम्हाला रोज शेकड्याने येत असत. महाराष्ट्रात कोणाच्याही केसाला धक्का लागणार नाही,” असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं. ते आज (१२ मे) मुंबईत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देत होते.

अधिक वाचा  ज्ञानदेवें रचिला पाया … तुका झालासे कळस। भजन करा सावकाश।; देहू मंदिरात भागवत पताका खांब

संजय राऊत म्हणाले, “कोणी कोणाला हात लावत नाही. अशी पत्रे शिवसेना भवनात आम्हाला रोज शेकड्याने येत असतात. महाराष्ट्र सुरक्षित आहे. महाराष्ट्रात कोणाच्याही केसाला धक्का लागणार नाही. जर कोणाच्या केसाला धक्का लागला तर केंद्र सरकार त्यांची सीआयएसएफची सुरक्षा द्यायला समर्थ आहे.”

राज ठाकरे इतक्या वर्षांपासून महाराष्ट्रात राहतात. ते ठाकरे आहेत. महाराष्ट्रातील कोणत्याही राजकीय नेत्याला हात लावण्याची कोणाचीही हिंमत नाही. महाराष्ट्रात ठाकरे सरकार आहे. ही स्टंटबाजी सोडून द्यावी. महाराष्ट्राच्या कोणत्याही नागरिकाला धोका असेल तर येथील गृहमंत्री, गुप्तचर यंत्रणा आणि सरकार त्यांच्या सुरक्षेसाठी जबाबदार आहेत. ते त्यांची पूर्ण रक्षा करतील,” असंही संजय राऊत यांनी नमूद केलं.

अधिक वाचा  आईनेच नवजात अर्भकास शौचालयाच्या भांड्यात कोंबलं, पुणे पोलिसांमुळे वाचले तान्हुल्याचे प्राण

संजय राऊत म्हणाले, “अयोध्येच्या आंदोलनात दोन्ही बाजूने हजारो लोकांनी प्राण गमावले आहेत. रक्ताच्या नद्या वाहिल्या आहेत. त्यानंतर आता राम मंदिर उभं राहत आहे. राम मंदिर आमच्या सर्वांच्या अस्मितेचा विषय होता. ते उभं राहत आहे. त्यामुळे आता देशात महागाई, बेरोजगारी, राष्ट्रीय सुरक्षा या विषयाकडे पाहणं गरजेचं आहे.”

“या देशाचा रुपया ७७ रुपये प्रति डॉलर इतका खाली घसरला आहे. इतिहासात रुपया इतका खाली घसरला नव्हता. देशाची अर्थव्यवस्था कोसळली आहे. लोकांना नोकऱ्या नाहीत, महागाईशी सामना करता येत नाही. राज्यकर्ते आणि सर्व पक्षांनी यावर बोलणं गरजेचं आहे,” असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं.

अधिक वाचा  पुण्यातही ज्ञानवापी? शेख सल्लाहुद्दिन दर्ग्याची सुरक्षा वाढली, फौजफाटा तैनात

“काही काळ वादग्रस्त विषय दूर ठेवलं पाहिजे. नाहीतर श्रीलंकेत जी स्थिती आहे तशी भारतात येईल. श्रीलंकेत जसं राज्यकर्त्यांना रस्त्यावर धरून बदडलं, राष्ट्रपती, पंतप्रधान पळून गेलेत, त्यांच्या घरांना आगी लावल्या आहेत ही परिस्थिती येऊ नये असं वाटत असेल तर राज्यकर्ते आणि राजकारण्यांनी लोकांच्या प्रश्नावर बोलावं,” असंही संजय राऊत यांनी नमूद केलं.