नीरा : पुणे-पंढरपूर पालखी मार्गावरील अपघातांच्या घटना वाढत आहेत. नीरा नदीच्या पुलाच्या काठावरील संत ज्ञानेश्वर महाराज पालखी विसाव्या समोर ट्रक-टँकरची समोरासमोर जोरदार धडक झाल्याने दोघे गंभीर जखमी झाले आहे.जखमींना खाजगी रुगणालयात दाखल केले असून, घटनास्थळी नीरा पोलीस दाखल झाले आहेत.

प्रत्यक्ष दर्शनींनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवार (११ मे) रोजी रात्री १०:३० च्या सुमारास लोणंद बाजूने मोकळा टँकर (क्रमांक एम.एच – १७- बी.वाय – ३५७५) नीरा येथील कंपनीकडे चालला होता. तर पुण्याकडून कोल्हापुरकडे मालवाहतूक करणारा ट्रक (क्रमांक एम.एच – ०९ – सी.ए – १३९७) भरधाव वेगाने निघाला होता. नीरा नदीच्या पुलाशेजारी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग व नगर बायपास एकत्रित येतो. त्या ठिकाणी लोणंद बाजुकडून येणारा टँकर पालखी मार्गावरून नगर बायपासकडे वळत होता. त्याचवेळी पुणे बाजूकडून भरधाव येणाऱ्या मालवाहतूकीच्या ट्रकने मोकळ्या टँकरला समोरासमोर धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की त्या आवाजाने परिसरातील नागरीक घराबाहेर आले.

अधिक वाचा  श्रीगोंद्यात काॅंग्रेस - राष्ट्रवादी आघाडी दुभंगणार? राहुल जगताप यांच्या हाती सुत्रे

मालवाहतूक करणाऱ्या ट्रकने मोकळ्या टँकरला दिल्या जोरदार धडकेने टँकरची दिशाच बदलली. त्यामुळे दोनही वाहने नक्की कुठे चालली होती हे सुरवातीला कळतच नव्हते. पण टँकरच्या मागे दुचाकीवर असलेल्या युवकांनी हा अपघात प्रत्यक्ष पाहिल्याने त्यांनी माध्यम प्रतिनिधींना तातकाळ फोन करुन ही माहिती दिली. अपघातस्थळी नीरा पोलीस दुरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक कैलास गोतपागर, सुदर्शन होळकर, निलेश जाधव तातकाळ दाखल झाले होते.

पुढील महिन्यात याच धोकादायक मार्गावरुन लाखोंचा वैष्णवांचा मेळा घेऊन संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा जाणार आहे. पालखी सोहळा एका महिन्यावर येऊन ठेपला असतानाच अपघाताचे सत्र काही केल्या थांबेना किंवा कमीही होईनात. गेली वीस वर्ष जेजुरी ते नीरा दरम्याचा पालखी मार्गाचे एक इंचही रुंदीकरण झाले नाही वाहनांची संख्या व वेग कैक पटीने वाढला. त्यामुळे या भागात अपघातांचे प्रमाण वाढत आहे. त्यावर प्रशासनाने उपाययोजना कराव्यात अशी मागणी स्थानिकांतून होत आहे.