पुणे : पुण्यातील कोंढवा भागात राहणार्‍या दाम्पत्याने अकरा वर्षाच्या पोटच्या मुलाला २२ हून अधिक कुत्र्यांसोबत खोलीत डांबून ठेवल्याची घटना घडली आली आहे. दोन वर्षे कुत्र्यांसोबत वास्तव्य केल्याने मुलगा कुत्र्यांप्रमाणे वर्तन करीत असल्याची धक्कादायक बाब चाइल्ड लाईन या संस्थेच्या निर्दशनास आली आहे.

या प्रकरणी संजय लोधरिया आणि शीतल लोधरिया या दाम्पत्याविरोधात कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोंढवा येथील कृष्णाई इमारतीमध्ये लोधरिया कुटुंब राहण्यास आहेत. त्यांनी २२ कुत्री पाळली आहेत. कुत्र्यांमुळे त्रास होत असल्याची तसेच दुर्गंधी पसरत असल्याची स्थानिकांची तक्रार आहे. दरम्यान, कुत्री असलेल्या खोलीत ११ वर्षीय मुलगा जवळपास दोन वर्षांपासून राहत आहे. तो मुलगा खिडकीत बसून कुत्र्यासारखे वर्तन करतो, अशी तक्रार करण्यात‌ आली आहे. चाइल्ड लाईन संस्थेच्या समन्वयक अपर्णा मोडक यांना एकाने कॉल करून ही माहिती दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

अधिक वाचा  धर्मवीर 'पाहताना राजन विचारे अन् प्रताप सरनाईकांना डुलकी; फोटो व्हायरल

मोडक यांनी पाहणी केली तेव्हा अकरा वर्षाचा मुलगा एक खोलीत होता तसेच आणि त्याच्या आजूबाजूला विविध वयोगटाची २० ते २२ कुत्री आढळून आली.मोडक यांनी याबाबत तक्रार देताच कोंढवा पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केल्यावर तिथे तो मुलगा कुत्र्यांबरोबर दिसून आला. या प्रकरणी आरोपी वडील आणि आई या दोघांकडे चौकशी सुरू आहे.

लोधरिया दाम्पत्य काहीसे विक्षिप्त असून आपल्याला सोसायटीतील रहिवासी त्रास देत असल्याची तक्रार घेऊन ते यापूर्वी आले होते, असे पोलिसांनी सांगितले. आम्ही कुत्र्यांचे पालनपोषण करतो असे त्यांचे म्हणणे होते. मात्र, या दाम्पत्याने आपल्या मुलाला २२ कुत्र्यांसोबत कोंडून ठेवले असल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्तीने केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. हे दाम्पत्य विक्षिप्त असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. तसेच मुलाची वैद्यकीय तपासणी करून त्याचे समुपदेशन करण्यात येत असल्याचे कोंढवा पोलिसानी सांगितले.