पिंपरी : मुदतपूर्व बदलीने मोठी चर्चा झालेले पिंपरी-चिंचवडचे माजी पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश हे अखेर दहा दिवसानंतर बदलीच्या ठिकाणी मुंबईत रुजू झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या बदलीच्या ठिकाणात बदल होण्याच्या चर्चला आता पूर्णविराम मिळाला आहे. गेल्या महिन्यात त्यांची २० तारखेला विशेष पोलिस महानिरीक्षक (VIP सुरक्षा) मुदतपूर्व बदली झाली होती.

दीड वर्षात कामाचा ठसा उमटवूनही कृष्णप्रकाश यांची बदली झाल्याने त्याबद्ल आश्चर्य व्यक्त करण्यात आले होते. त्यातून ही बदली रद्द करण्याची मागणी शहरातील काही संघटनांनी केली होती. यापूर्वी चार वर्षे काम केलेल्या ठिकाणीच पुन्हा (व्हीआय़पी सुरक्षा) बदली झाल्याने तो आपल्यावर अन्याय असल्याची भावना केपींनीच व्यक्त केली होती. त्यामुळे ते त्याविरोधात `कॅट` (केंद्रीय प्रशासकीय लवाद) मध्ये दाद मागतील, अशी शक्यता होती. मात्र, बदलीच्या दुसऱ्याच दिवशी पिंपरी-चिंचवडचे नवे पोलिस आयुक्त म्हणून अंकुश शिंदे यांनी पदभार स्वीकारला. परिणामी कॅटमध्ये जाण्यास ब्रेक बसला. तरीही ते नाराज होते. त्यांनी पूर्वी काम केलेल्या ठिकाणीच पुन्हा बदली झाल्याने त्यात बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र, ती फोल ठरली.

अधिक वाचा  हसीना पारकरचा बॉडीगार्ड, ड्रायव्हर राष्ट्रवादीचा कार्यकर्ता, नवाब मलिक यांचे ईडीला खळबळजनक जबाब

राज्यातील अतिमहत्वाच्या व्यक्तींना सुरक्षा पुरविणाऱ्या राज्य पोलिस दलाच्या व्हीआयपी सुरक्षा विभागाचे प्रमुख म्हणून त्यांनी हिंदू जिमखाना, दादर येथील कार्यालयात पदभार हाती घेतला. नव्या ठिकाणी रुजू होताच प्रथमच त्यांनी माध्यामांशी मन मोकळेपणाणे संवाद केला. पूर्वी काम केलेल्या ठिकाणीच पुन्हा बदली झाल्याने समाधानी आहात का? अशी विचारणा केली असता नव्या बदलीच्या ठिकाणी समाधानी असणं महत्वाचं नाही, तर काम महत्वाचं असतं, असं सूचक वक्तव्य त्यांनी केलं. आपल्या बदलीमागील निश्चीत कारण, मात्र अद्यापही कळलं नसल्याचे त्यांनी सांगितले. पण, राज्य सरकारला व्हीआयपी सुरक्षेत माझ्या कामाची गरज वाटली असावी, असं ते स्पोट्रिंगली म्हणाले.

अधिक वाचा  पंधरा दिवसापूर्वी शिवसेनेत गेलेले मनसेचे नेते पुन्हा स्वगृही परतणार...

सध्या राज्यात ११३ जणांना राज्य सरकारचे, तर ३९ जणांना केंद्राचे विविध श्रेणीतील सुरक्षा कवच असल्याची माहिती त्यांनी दिली. अल्ट्रामॅन, आर्यनमॅन पुरस्कारप्राप्त सर्वाधिक तंदुरुस्त आय़पीएस अधिकारी कृष्णप्रकाश हे अल्पावधीतच दबंग अधिकारी म्हणून पिंपरी-चिंचवडमध्ये ओळखले जाऊ लागले होते. २० एप्रिलला त्यांची बदली झाल्यानंतर पंधरवड्यानंतर ६ मे रोजी त्यांनी वादग्रस्त जमिनींच्या खरेदी-विक्रीतून दोनशे कोटी रुपयांची कमाई तथा वसूली पिंपरी-चिंचवडमध्ये केल्याचे पत्र व्हायरल झाले. त्यामुळे पोलिस दलातच नव्हे, तर शहरातही प्रचंड खळबळ उडाली. मात्र, आपल्या बदनामीसाठी हे बनावट पत्र व्हायरल केल्याचा खुलासा त्यांनी लगेच केला होता.