मुंबई: सुप्रीम कोर्टाने ओबीसी आरक्षणाबाबतच्या याचिकेवर सुनावणी देताना निवडणूक आयोगाला निवडणुकीबाबतचे आदेश दिल्यानंतर एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. राज्य निवडणूक आयोगाने आज मोठी घोषणा केली आहे. राज्यातील पालघर, धुळे, नंदुरबार, वाशीम, नागपूर आणि अकोला जिल्हा परिषदेतील 2 निवडणूक विभागांच्या आणि पंचायत समितीतील 6 निर्वाचक गणांच्या रिक्तपदांसाठी पोटनिवडणुकीचा घोषणा करण्यात आली आहे. ही पोटनिवडणूक 5 जून आणि 6 जून या दरम्यान होईल. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, 5 जूनला मतदान होईल तर 6 जूनला मतमोजणी केली जाईल.

राज्य निवडणूक आयोगाने याबाबत प्रसिद्धीपत्रक जारी करत माहिती दिली आहे. पालघर, धुळे, नंदुरबार, वाशीम, नागपूर आणि अकोला जिल्हा परिषदेतील 2 निवडणूक विभागांच्या आणि पंचायत समितीतील 6 निर्वाचक गणांच्या रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी 5 जून 2022 रोजी मतदान होणार आहे. तर 6 जून 2022 रोजी मतमोजणी होईल, अशी घोषणा राज्य निवडणूक आयोगाने आज केली.

अधिक वाचा  मलायका अरोरा पुन्हा लग्नबंधनात; अर्जुन कपूरशी थाटणार संसार, तारीखही ठरली!

नंदुरबार जिल्हा परिषदेच्या चितवी (ता.नवापूर) आणि अकोला जिल्हा परिषदेच्या हातरुण (ता. बाळापूर) या निवडणूक विभागासाठी ही पोटनिवडणूक होत आहे. पोशेरा (मोखडा, जि. पालघर), हिसाळे (शिरपूर, जि.धुळे), हट्टी खु. (साक्री, जि. धुळे), असली (अक्राणी, जि. नंदुरबार), ब्राम्हणवाडा न- मारसुळ (मालेगाव, जि.वाशीम) आणि चणकापूर (सावनेर, जि. नागपूर) या पंचायत समित्यांच्या निर्वाचक गणांच्या पोटनिवडणुकांसाठीदेखील मतदान होईल. संबंधित निवडणूक विभाग आणि निर्वाचक गणांत आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. निकाल जाहीर होईपर्यंत ती लागू राहील, अशी माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे.