भंडारा : भंडारा, गोंदिया पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने आमच्या पाठीत सुरा खुपसला असल्याची जहरी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. गोंदियात झालेल्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणुकीत राष्ट्रवादीने भाजपची साथ दिली. यावरुन पटोले यांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे.

भंडारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलाताना पटोले म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसने अनेक ठिकाणी भाजपसोबत युती करत सत्ता स्थापन केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व खासदार प्रफुल्ल पटेल यांच्यासोबत माझे बोलणे झाल्यावरसुद्धा त्यांनी प्रत्येक ठिकाणी भाजपसोबत युती केली. गोंदिया जिल्हा परिषदमध्ये सुद्धा राष्ट्रवादी भाजपसोबत जाऊन राष्ट्रवादीने आमच्या पाठीत सुरा खुपसला.

अधिक वाचा  संभाजीराजे यांना १० अनुमोदकही जमले नाही ; उद्या अधिकृत पत्रकार परिषदेत निर्णय

भंडारा जिल्हा परिषदेतही भाजप आणि राष्ट्रवादीच्या सत्ता स्थापन करण्यासाठी हालचाली सुरु होत्या. मात्र, भाजपचे माजी आमदार चरण वाघमारे यांनी काँग्रेसला साथ दिल्यामुळे नाना पटोले जिल्हा परिषदेवर काँग्रेसचा झेंडा फडकवण्यात यशस्वी झाले.

वाघमारे यांच्या बंडखोर गटाचे ५ आणि १ अपक्ष अशा सदस्यांनी सर्वाधिक २१ सदस्य असलेल्या काँग्रेसला पाठिंबा दिला. त्यांना बसपा १, शिवसेना १, वंचित १ आणि अपक्ष २ अशा सदस्यांची साथ मिळाली. तर भाजपमधील आमदार परिणय फुके आणि खासदार सुनिल मेंढे यांच्या ७ सदस्यांनी राष्ट्रवादीची साथ दिली. राष्ट्रवादीचे १३ सदस्य आहेत. भंडारा जिल्हा परिषदेत भाजप आणि राष्ट्रवादीला विरोधी बाकावर बसावे लागले आहे. यामुळे पटोले यांनी भाजप आणि राष्ट्रवादीच्या या युतीमुळे त्यांच्यावर सडकून टीका केली.