पुणे- मनसेच्या पुणे शहराध्यक्ष पदावरुन हटविण्यात आल्यानंतर वसंत मोरे यांना पक्षात टाळलं जात असल्याचं आज पुन्हा एकदा दिसून आलं आणि त्यावर खुद्द वसंत मोरे यांनी स्वत:हून उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे.

पक्षात शहर पातळीवर मला टाळलं जात आहे. त्यामुळे आता राज ठाकरे येतील तेव्हाच मी पक्ष कार्यालयात जाणार, असं वसंत मोरे म्हणाले.

शहराध्यक्ष पद गेल्यानंतर आज पहिल्यांदाच वसंत मोरे कोअर कमिटीसोबत पोलीस आयुक्तांना भेटायला आले होते. त्यावेळीही कोअर कमिटी आणि मोरे यांच्या दुरावा पाहायला मिळाला. पक्षातील कार्यकर्ते आणि आपल्यात संवादच नाही त्यामुळे सुसंवादाचा प्रश्न येत नाही, असं वसंत मोरे म्हणाले. पक्षात शहर पातळीवर आपल्याला टाळलं जात असल्याची नाराजी त्यांनी यावेळी बोलून दाखवली.

अधिक वाचा  २२१ जोडप्यांचे तडजोडीने फुलले संसार; स्वखुशीने १०४ विभक्त कुटुंब

“ग्रूपवर मेसेज होता की राज साहेबांच्या आदेशानुसार त्यामुळे मी आज इथं आयुक्तांच्या भेटीसाठी आलो. पण इथं कार्यकर्त्यांमध्ये संवादच नाहीय. त्यामुळे सुसंवादाचा विषयच येत नाही. मी पक्ष कार्यालयात जाणार नाही. हे मी राज साहेबांनाही सांगितलं आहे. ज्यादिवशी राज साहेब येतील त्याच दिवशी पक्ष कार्यालयात जाईन. मी कुणालाही टाळत नाही. पण मला टाळलं जातंय”, असं वसंत मोरे म्हणाले.

लाऊडस्पीकरच्या मुद्द्यावरुन आज पुण्यातील मनसेच्या शिष्टमंडळानं पोलीस आयुक्तांची भेट घेतली. तर राज्यातील सर्व पदाधिकारी देखील स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांना भेटत आहेत. मुंबईत पोलीस आयुक्तांनी आवाजाबाबत जे पत्र काढलं आहे तसंच पत्रक पुणे पोलीस आयुक्तांनीही काढावं अशी मागणी मनसेनं यावेळी केली. मनसेचं हे शिष्टमंडळ आधी आयुक्तांना भेटले त्यानंतर वसंत मोरे पोहोचले. त्यामुळे यावेळीही शिष्टमंडळासोबत वसंत मोरे उशिरा पोहोचले. याबाबत विचारण्यात आलं असता पार्किंगला जागा मिळाली म्हणून थोडा उशीर झाला अशी सारवासारव वसंत मोरे यांनी केली.