भारतीय शास्त्रीय संगीतातील महान दिग्गजांपैकी एक, संतूर वादक पंडित शिवकुमार शर्मा यांचे आज निधन झाले. अमिताभ मट्टू यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. पंडित शिवकुमार शर्मा हे 84 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाच्या बातमीने त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. त्यांच्या जाण्याने भारतीय शास्त्रीय संगीताची मोठी हानी झाली आहे.
पंडित शिवकुमार शर्मा यांचे चित्रपट जगतातही महत्त्वाचे योगदान होते. बॉलिवूडमध्ये ‘शिव-हरी’ (शिवकुमार शर्मा आणि हरी प्रसाद चौरसिया) या जोडीने अनेक हिट गाण्यांना संगीत दिले. श्रीदेवीवर चित्रित झालेल्या ‘मेरे हाथों में नौ नौ चुडियाँ’ या गाण्याचे संगीत या हिट जोडीने दिले होते.
15 मे रोजी होणार होती मैफील
सर्वात दुःखाची गोष्ट म्हणजे शिवकुमार शर्मा यांचा 15 मे रोजी कार्यक्रम होणार होता. अनेक लोक या खास क्षणाचा भाग होण्याची वाट पाहत होते. या कार्यक्रमात शिवकुमार शर्मा हरिप्रसाद चौरसिया यांच्यासोबत गाणार होते. पण, या कार्यक्रमाच्या काही दिवस आधी शिवकुमार शर्मा यांनी या जगाचा कायमचा निरोप घेतला.
पंडित शिवकुमार शर्मा यांचा जन्म जम्मू येथे झाला. वयाच्या 13 व्या वर्षी त्यांनी संतूर शिकायला सुरुवात केली. त्यांचा पहिला परफॉर्मन्स 1955 मध्ये मुंबईमध्ये झाला होता. या महान व्यक्तिमत्वाने वयाच्या 84 व्या वर्षी जगाचा कायमचा निरोप घेतला.