उत्तरप्रदेश : एकीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे  यांच्या अयोध्या दौऱ्यासाठी मनसैनिकांकडून जय्यत तयारी सुरू आहे. तर दुसरीकडे उत्तरप्रदेशात मात्र राज ठाकरे यांना रोखण्याचा प्लान आखला जात आहे. उत्तरप्रदेशातील कैसरगंजचे भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी राज ठाकरेंविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. उत्तर भारतीयांची जाहीरपणे माफी मागितल्यशिवाय राज यांना अयोध्येत घुसू देणार नाही, असा इशारा बृजभूषण सिंह यांनी दिला आहे. माझा विरोध मराठ्यांना नाही तर, राज ठाकरेंना आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी मी आदर्श मानतो असंही ते म्हणाले.

“मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सातत्याने उत्तर भारतीयांच्या विरोधात भूमिका घेतली आहे. तसेच त्यांचा अपमानही केला आहे. त्यामुळे राज ठाकरे यांनी सार्वजनिकरीत्या हात जोडून उत्तर भारतीयांची माफी मागावी, मगच अयोध्येत प्रवेश करावा,” अशी बृजभूषण सिंह यांची मागणी आहे. दरम्यान राज ठाकरे यांचा अयोध्येत येण्यापासून रोखण्यासाठी बृजभूषण यांनी नंदिनी नगर येथे संत-महंतांची बैठक बोलावली. या बैठकीला बुधवारी (10 मे) 11 वाजता सुरूवात होणार आहे. बैठकीपूर्वी बृजभूषण सिंह यांनी नवाबगंज ते नंदिनीनगर अशी ५ किमीची रॅली काढून जोरदार शक्तीप्रदर्शनही केलं. या रॅलीत मोठा जनसमुदाय जमला होता.

अधिक वाचा  हनुमानाचं खरं नाव काय? प्रश्न विचारताच नवनीत राणांची पंचाईत..

दरम्यान, रॅली काढून शक्तीप्रदर्शन केल्यानंतर बृजभूषण सिंह यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, “राज ठाकरे दबंग नाही तर उंदीर आहेत. पहिल्यांदा ते बाहेर येत आहेत.आज आम्ही केलेलं हे शक्तिप्रदर्शन नाही, तर राज ठाकरेंना अयोध्येत येण्यापासून रोखण्यासाठी ही तयारी आहे. खरे शक्तीप्रदर्शन तुम्हाला 5 जून रोजी पाहायला मिळेल. आज फक्त 50 हजारांची गर्दी जमणार आहे. पण जेव्हा राज ठाकरे 5 जूनला अयोध्येत येतील तर त्यांना रोखण्यासाठी 10 लाखांचा जमाव तयार असेल. त्यांनी माझं म्हणणं ऐकलं नाही आणि उत्तर भारतीयांची माफी मागितली नाही तर मी वचन देतो की, ते आयुष्यात कधीही उत्तरप्रदेश, बिहार, छत्तीसगड, झारखंडमध्ये येऊ शकणार नाहीत”.

अधिक वाचा  राज ठाकरेंचा आजपासून पुणे दौरा; वसंत मोरेंना फोन, भेटीला बोलावण्याचं नेमकं कारण काय?

दुसरीकडे राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याबाबत मनसैनिकांकडून रणनिती आखली जात आहे. राज ठाकरे यांच्या मुंबईतील ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रमुख नेत्यांची आज, मंगळवारी बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीस मनसेचे सर्व नेते आणि सरचिटणीस उपस्थित राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. राज ठाकरे हे 5 जून रोजी अयोध्या दौऱ्यावर जाणार असून या दौऱ्यासाठी मनसेकडून 10 ते 12 रेल्वेगाड्यांची मागणी करण्यात आली आहे.