मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी मोठं विधान केलं आहे.निवडणुकांबाबत आमच्या पक्षात दोन मतप्रवाह असल्याचं पवार यांनी म्हटलं आहे. ते कोल्हापुरात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
“निवडणुकांबाबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन मतप्रवाह आहेत. काहींना वाटतंय की निवडणूक काँग्रेस आणि शिवसेनेला सोबत घेऊन लढावी. तर काही जणांनी एकट्यानं निवडणूक लढण्याचा आग्रह धरला आहे. यावर पक्षात सविस्तर चर्चा होऊन येत्या काळात निर्णय घेतला जाईल”, असं शरद पवार म्हणाले. तसंच कोर्टानं १५ दिवसांत निवडणुका घ्या असे आदेश दिलेले नाहीत, असंही पवार यांनी यावेळी स्पष्ट केलं.
“सुप्रीम कोर्टानं १५ दिवसांत निवडणुका घ्या असं म्हटलेलं नाही. निवडणूक तयारीची प्रक्रिया १५ दिवसांत सुरू करा असं कोर्टानं सांगितलं आहे”, असं शरद पवार यांनी यावेळी स्पष्ट केलं. देशपातळीवर मोदींना सक्षम पर्याय देण्यात अद्याप विरोधी पक्षांना यश येत नसल्याच्या प्रश्नावर बोलत असताना शरद पवार यांनी विरोधी पक्षांमधील अंतर्गत मतभेदांवर बोट ठेवलं. “मोदींना सक्षम पर्याय देण्यासंदर्भात काँग्रेससह सर्व पक्षांनी याचा अंतर्गत निर्णय घेणं महत्वाचं आहे”, असं शरद पवार म्हणाले.