पुणे –शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी तसेच सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला चालना देण्यासाठी शहरातील प्रमुख पाच रस्त्यांवर “पे अँड पार्क’ योजना लवकरच राबविण्यात येणार आहे.

याबाबतचा ठराव महापालिकेच्या मुख्यसभेत मान्य करण्यात आला होता. मात्र, या निर्णयास राजकीय विरोध झाल्याने तो मागे पडला होता. त्यानंतर आता महापालिकेत प्रशासक नियुक्‍त करण्यात आल्यानंतर शासनाच्या सूचनेनुसार, या प्रस्तावाची अंमलबजावणी महापालिकेकडून करण्यात येणार असून त्याबाबतची प्राथमिक बैठक महापालिकेत सोमवारी झाली. त्यानंतर लवकरच पोलीस प्रशासनाशी बैठक घेऊन अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली. दरम्यान, पोलिसांनी जे रस्ते नो पार्किंग म्हणून जाहीर केले आहेत त्या ठिकाणी शुल्क आकारून ही योजना प्रस्तावित करण्याचा पालिकेचा मानस आहे.

अधिक वाचा  पुण्यातही ज्ञानवापी? शेख सल्लाहुद्दिन दर्ग्याची सुरक्षा वाढली, फौजफाटा तैनात

महापालिकेत सत्ताधारी 2017-18 मधे “पे अँड पार्क’बाबत प्रस्ताव आणण्यात आला होता. त्यानंतर या प्रस्तावास विरोध झाल्याने शहरातील प्राथमिक पाच रस्त्यांवर ही योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, त्यानंतरही वाद सुरूच असल्याने त्यावर तोडगा म्हणून प्रशासनाने शहरातील व्यावसायिक रस्ता, गर्दीचा रस्ता, प्रत्येक आमदारांच्या मतदारसंघातील एक रस्ता अशाप्रकारे रस्त्यांवर “पे अँड पार्क’ सुरू करावे त्यानंतर टप्प्याटप्प्याने या धोरणाची अंमलबजावनी करावी, असा प्रस्ताव तयार केला होता. मात्र, त्याची अंमलबजावणी झालेली नव्हती त्यानंतर आता पुन्हा शहरातील वाहतूक कोंडीची स्थिती लक्षात घेऊन तसेच सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणखी सक्षम करण्यासाठी या प्रस्तावाची अंमलबाजावणी करण्याचे नियोजन प्रशासनाने सुरू केले आहे.