पुणे- महापालिका निवडणुकांसाठी पालिकेने 10 मार्च 2022 रोजी सादर केलेल्या प्रभागरचनेच्या अंतिम आराखड्यासाठी राज्य निवडणूक आयोगाकडून महापालिका अधिकाऱ्यांना मंगळवारी मुंबईत बोलविण्यात आले होते या बैठकीमध्ये संबंधित अधिकाऱ्यांना 17 मे पर्यंत प्रारुप प्रभाग रचना जाहीर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या आराखड्याबाबत चर्चा करून त्यानंतर आयोगाकडून अंतिम आराखडा सादर केला जाण्याची शक्‍यता आहे. महापालिकेच्या निवडणूक विभागाचे प्रमुख यशवंत माने आणि उपायुक्‍त अजित देशमुख हे या बैठकीस गेले होते.

राज्यातील मुदत संपलेल्या महापालिका, जिल्हा परिषदा तसेच ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम 2 आठवड्यांच्या आत जाहीर करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयने राज्य निवडणूक आयोगास दिलेले आहेत. हे आदेश देतानाच राज्य शासनाने निवडणूकांचे अधिकार स्वत:कडे घेण्याबाबत केलेल्या कायद्याच्या आधी निवडणूक आयोगाने प्रभाग रचनेबाबत केलेली प्रक्रिया पुढे कायम ठेऊन निवडणुका घ्याव्यात असा आदेश दिला आहे. त्यामुळे आयोगाकडून निवडणुकांची प्रक्रिया पुढे सुरू करण्यात आली असून सात दिवसाच्या (१७ मे) आत अंतिम प्रभाग रचना जाहीर करणे अनिवार्य झाले आहे.

अधिक वाचा  ओवेसी याच्या प्रतिमेवर थुंकून पतित पावन तर्फे निषेध आंदोलन

महापालिकेने 10 मार्च रोजी प्रभागांवर घेतलेल्या हरकती 58 प्रभागांवरील हरकती-सूचनांची सुनावणी प्रक्रिया पूर्ण करून यशदाचे महासंचालक एस चोकलिंगम यांनी प्रभागरचनेचा अहवाल दि. 10 मार्चला राज्य निवडणूक आयोगाला सादर केला होता. आता केवळ निवडणूक आयोगाकडून अंतिम प्रभाग रचना करणे बाकी आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार निवडणूक कार्यक्रम दोन आठवड्यात जाहीर करणे बंधनकारक आहे. त्यानुसार पुणे महापालिकेचा प्रभागरचनेचा अंतिम आराखडा जाहीर केला जाईल, असे सांगण्यात येत आहे. पुणे महापालिकेच्या निवडणूक कार्यालयात सध्या न्यायालयांनी देण्यात आलेल्या मुदतीपूर्वी सर्व कामे पूर्ण करण्याची लगबग सुरू झाली असून त्वरित निवडणुका जाहीर झाल्यास कार्यालयीन कामकाज सुरळीत करण्याच्या दृष्टीने नियोजन सुरू झाले आहे.