नवी दिल्ली : राजस्थानमधील उदयपूर इथे १३ ते १५ मे दरम्यान काँग्रेसचे चिंतन शिबिर पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी तसेच रणनिती ठरवण्यासाठी नुकतीच काँग्रेस राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पार पडली. सोनिया गांधींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत राहुल गांधी, प्रियांका गांधी, गुलाम नबी आझादांसह कार्यकारिणीचे सदस्य, प्रभारी उपस्थित होते. यावेळी सोनिया गांधी यांनी पक्षाच्या सर्व जेष्ठ सदस्यांना आणि कार्यकर्त्यांना भावनिक साद घालत पुढे येऊन पक्षाचे ऋण फेडणे आवश्यक आहे, असे मत व्यक्त केले.
कार्यकारिणीच्या मागील बैठकीमध्ये चिंतन शिबिर घेण्याचे जाहीर केले होते. त्याचा संदर्भ देत सोनिया गांधी यांनी यावेळी उदयपूरच्या चिंतन शिबिरात ‘उदयपूर नवसंकल्प’ स्वीकारला जाणार असल्याचे स्पष्ट केले. यात डिजिटल सदस्य नोंदणीसाठी पक्षाच्या घटनेत बदलही केला जाणार आहे. तसेच या चिंतन शिबिरामध्ये राजकीय, आर्थिक, सामाजिक न्याय, शेतकरी, तरुण आणि पक्ष संघटना या सहा विषयांवर साधकबाधक चर्चा करण्यात येणार आहे. शिवाय येणाऱ्या प्रतिनिधींना कोणत्या गटात सहभागी व्हायचे आहे याचीही पूर्वकल्पना गांधी यांनी दिली.
सोनिया गांधी यांनी पुढे बोलताना पक्षाच्या पुनरुज्जीवनासाठी उदयपूरमधून एकसुरात एकजूटतेचा, सुसंघटीतपणाचा, दृढ निश्चयाचा आणि कटिबद्धतेचा संदेश देण्यासाठी सहकार्याचे आवाहन काँग्रेसजनांना केले. त्या म्हणाल्या, की यासाठी कोणतीही जादूची छडी नाही. केवळ निःस्वार्थ सेवा, शिस्तबद्धता आणि सातत्यपूर्ण सामूहिक उद्देशाच्या भावनेतूनच आपण आपली दृढता आणि लवचिकता दाखवून देऊ. आपल्यातील प्रत्येकासाठी पक्ष आयुष्याच्या केंद्रस्थानी आहे. त्यासाठी आपली संपूर्ण निष्ठा देखील हवी आहे. आता जेव्हा आपण निर्णायक वळणावर आहोत, अशा वेळी आपण पुढे येऊन पक्षाचे ऋण फेडणे आवश्यक आहे, अशी अपेक्षाही सोनिया गांधींनी बोलून दाखविली.
चिंतन शिबिराला यांची उपस्थिती
चिंतन शिबिरात ४०० नेते सहभागी होणार असले तरी कोणाला त्यात स्थान मिळणार यावरून काँग्रेस नेत्यांमधून नाराजीचा सूर उमटू लागल्यानंतर पक्षातर्फे स्पष्टीकरण देण्यात आले. सर्व कार्यकारिणी सदस्य, कायम निमंत्रित आणि विशेष सदस्य, सर्व प्रदेशाध्यक्ष, विधिमंडळ पक्षनेते, विधान परिषदांमधील गटनेते, माजी केंद्रीय मंत्री, अखिल भारतीय काँग्रेस समितीचे प्रभारी सचिव आणि सहसचिव या चिंतन शिबिरात येतील, असे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी कार्यकारिणी बैठकीनंतर पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.