पुणे : शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेला दोनवेळा मुदतवाढ देऊनही वळपास २९ हजार जागा रिक्त असल्याचे दिसून येत आहे. मात्र आता प्रवेशांसाठी मुदतवाढ मिळणार नसल्याचे प्राथमिक शिक्षण संचालनालयाने स्पष्ट केले असून, सोडतीत प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी मंगळवारी (१० मे) अखेरचा दिवस आहे.

आरटीईअंतर्गत सामाजिक आणि आर्थिकदृष्टय़ा मागास घटकांतील विद्यार्थ्यांना राखीव जागांवर मोफत प्रवेश दिला जातो. या प्रवेश प्रक्रियेत यंदा ९ हजार ८६ शाळांमध्ये १ लाख १ हजार ९०६ जागा उपलब्ध आहेत. या जागांसाठी २ लाख ८२ हजार ७८३ विद्यार्थ्यांचे अर्ज दाखल झाले. प्राथमिक शिक्षण संचालनालयाने जाहीर केलेल्या सोडतीमध्ये ९० हजार ६८५ विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झाला. त्यानंतर प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली. आतापर्यंत प्रवेशासाठी दोन वेळा मुदतवाढ देऊनही जागा रिक्त असल्याचे चित्र आहे.

अधिक वाचा  पुण्यात स्मृती इराणी यांच्या कार्यक्रमात राडा, राष्ट्रवादीच्या महिलांना मारहाण, भाजप कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

आरटीई प्रवेश प्रक्रियेतील शैक्षणिक वर्ष २०२२-२३ च्या प्रवेशांसाठीच्या निवड यादीतील विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी अंतिम मुदत १० मे असल्याबाबत पालक, शाळांच्या निदर्शनास आणून देण्याच्या सूचना प्राथमिक शिक्षण संचालक दिनकर टेमकर यांनी पत्राद्वारे दिल्या. त्यामुळे आता आरटीई प्रवेशांसाठी मुदतवाढ मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.